Join us  

टोमॅटो अवघा २ रुपये किलो, आवक वाढल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 11:55 PM

निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर कांद्याच्या भावात आलेल्या तेजीमुळे कांदा उत्पादक खूश असताना, परराज्यात घटलेली मागणी व स्थानिक ठिकाणी कमालीचे वाढलेले उत्पादन, यामुळे नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे भाव मात्र कोसळले.

नाशिक : निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर कांद्याच्या भावात आलेल्या तेजीमुळे कांदा उत्पादक खूश असताना, परराज्यात घटलेली मागणी व स्थानिक ठिकाणी कमालीचे वाढलेले उत्पादन, यामुळे नाशिक जिल्ह्यात टोमॅटोचे भाव मात्र कोसळले. वणी, पिंपळगाव बसवंत, तसेच चांदवड येथील बाजार समित्यांमध्ये २ ते ४ रुपये प्रतिकिलो असा भाव मिळू लागल्याने, टोमॅटो उत्पादकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे.पिंपळगाव बसवंत बाजार समितीत मंगळवारी सुमारे ५ हजार कॅरेट टॉमेटोंची आवक झाली. प्रतिकॅरेटला ४० ते ८१ रुपयांपर्यंत(२० किलोचे एक कॅरेट) भाव मिळाला. अत्यंत कमी भाव मिळाल्याने, लागवडीचा खर्चही निघत नसल्याचे शेतक-यांनी सांगितले. देशातील विविध राज्यांमध्ये वाढते उत्पादन व खरेदीदार राज्यांची गरज भागवून, शिल्लक राहिलेल्यामुळे टोमॅटोचे भाव घसरले असून, उत्पादकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.काही कालावधीपूर्वी टोमॅटो उत्पादन करणा-या राज्यांमध्ये हवामानाचा फटका बसल्याने, महाराष्ट्रातील विशेषत: नाशिक जिल्ह्यातील टोमॅटोेंची मागणी वाढली होती. मोठा आकार, प्रतवारी, दर्जा टिकवणक्षमता अशी वैशिष्ट्ये असलेल्या टोमॅटोंना ५० रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला होता. त्यामुळे उत्पादकांमध्येही आनंदाचे वातावरण होते. मात्र, सध्या परिस्थिती बदलली आहे.गुजरात राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर टॉमेटो उत्पादन सुरू असल्याची माहिती व्यापारी व निर्यातदार संजय उंबरे यांनी दिली. गुजरातमधून शेकडो ट्रक टॉमेटो दिल्ली येथे जातो. आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये कर्नाटक येथून टॉमेटो जातो, तर छत्तीसगड या राज्यातून ओरिसा, भुवनेश्वर या ठिकाणी टोमॅटो विक्रीसाठी जातो. राजस्थान भागातील टोमॅटो स्थानिक गरजपूर्तीनंतर गुजरात राज्याच्या सीमेलगतच्या काही भागांमध्ये पाठविण्यात येतो.त्यामुळे पूर्वी ज्या राज्यामध्ये टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर मागणी होती, त्या राज्यांमध्ये टोमॅटो उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असल्याने महाराष्ट्रातील भाव घसरल्याची माहिती उंबरे यांनी दिली.>लातूर भागातही लक्षणीय उत्पादन असल्याने नाशिक जिल्ह्यातील उत्पादकांना सॉस तयार करणाºया, तसेच मुंबई भागातील ग्राहक असे पर्याय उरले आहेत. सॉस तयार करणाºया कंपन्या २ रु पयांपासून टोमॅटोे खरेदी करतात. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील दह्याणे, दिंडोरी तालुक्यातील उमराळे व कोराटे, तसेच जळगाव जिल्ह्यातील कंपन्यांचा यात समावेश आहे. सॉस तयार करणाºया कंपन्या खरेदीदार असल्याने, तेवढी तरी दिलासादायक बाब उत्पादकांसाठी आहे.दिंडोरी तालुक्यातील खोरीफाटा व उपबाजारात थोड्या-फार फरकाने टोमॅटोे खरेदी करणारे व्यापारी मुंबई, कल्याण याबरोबर गुजरात राज्यातील दिव-दमण या केंद्रशासित भागात टॉमेटो पाठवितात. मात्र, अपेक्षित फायदा होत नाही, तसेच बहुतांशी कमी दरात प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान सोसण्याची तयारी ठेवावी लागते, अशी स्थिती आहे. यामुळे याचा एकत्रित परिणाम भाव घसरण्यावर झाल्याने उत्पादक धास्तावले आहेत.>जिल्ह्यातील बाजारपेठांत नीचांकी भावचांदवड, पिंपळगाव, वणीसह जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये टोमॅटोेला सरासरी २ ते ४ रुपये भाव मिळाला. चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी टोमॅटोेचे बाजारभाव अवघे ४ रुपये किलोवर आल्याने शेतकरी हैराण झाले.गत सप्ताहात टोमॅटोेचे बाजारभाव कोसळले होते. तेव्हा टोमॅटोे प्रतिकॅरेटला ५० रुपये (२० किलोचे कॅरेट) असे भाव असताना, या सोमवारी मात्र १११ रुपये जास्तीतजास्त, तर कमीतकमी ८५ रुपये प्रतिकॅरेट भाव होता. त्यामुळे ४ रुपये किलोप्रमाणे बाजारभाव होते. दरम्यान, कालच्या आठवडे बाजारात किरकोळ हातविक्रीसाठी टोमॅटोे ८ ते १० रुपये प्रतिकिलो भाव होता.>सॉस कंपन्यांकडून टॉमेटोंची खरेदी गुजरात राज्यातही टॉमेटो विक्रीसाठी जातो आहे. सॉस बनविणाºया कंपन्यांनाही सध्याची स्थिती टॉमेटो खरेदीसाठी अनुकूल असल्याने, आडत्यांच्या माध्यमातून अशा कंपन्या मोठ्या प्रमाणावर टॉमेटो खरेदी करीत आहेत. अनेक आडत्यांनी स्पर्धात्मक वातावरणात हक्काचे ग्राहक म्हणून कंपन्यांना टॉमेटो विक्रीची तयारी दाखविली असली, तरी अनुभवी आडत्यांकडे कंपन्यांचा कल आहे. कोसळलेल्या भावाचा फायदा घेण्यासाठी विविध घटक सरसावले असताना, तुलनात्मकरीत्या उत्पादकांना कमी भावात विक्रीच्या वातावरणाला सामोरे जावे लागत आहे.