Join us

शेअर बाजारात गडगडाट

By admin | Updated: August 2, 2014 03:48 IST

शेअर बाजार आज अक्षरश: गडगडला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ४१४ अंकांनी कोसळून २५,४८0.८४ अंकांवर बंद झाला

मुंबई : शेअर बाजार आज अक्षरश: गडगडला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल ४१४ अंकांनी कोसळून २५,४८0.८४ अंकांवर बंद झाला. ही गेल्या तीन आठवड्यांच्या काळातील सर्वांत मोठी एकदिवसीय घसरण ठरली आहे. जागतिक बाजारात विक्रीचा मारा झाल्यामुळे शेअर बाजाराच्या धारणेवर परिणाम झाला आहे. त्यातच जागतिक डॉलरही मजबूत होत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने आज ६१ रुपयांचा टप्पा ओलांडला. त्यामुळे बाजारावर परिणाम न होता, तरच नवल. या घडामोडींमागे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने मासिक बाँड खरेदीत केलेली कपात हे एक प्रमुख कारण आहे, असे जाणकारांनी सांगितले. बाँड खरेदीत कपात झाल्याने उगवत्या बाजारांतील भांडवलाचा ओघ आटेल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे बाजार घसरणीला लागला आहे. अमेरिकेच्या बिगर शेती रोजगाराचा अहवाल जाहीर होत आहे. त्यावर बाजारांचे भवितव्य अवलंबून असेल, असे सूत्रांनी सांगितले.आज शेअर बाजारात सकाळपासूनच मंदीची चाल होती. २५,७५३.९२ अंकांवर खालच्या पातळीवर उघडलेला बाजार आणखी घसरून २५,४५९.१३ अंकांवर गेला. दिवसअखेरीस ४१४.१३ अंकांची मोठी घसरण नोंदवून तो २५,४८0.८४ अंकांवर बंद झाला. ही घसरण १.६0 टक्क्यांची आहे. ८ जुलैनंतरची एका दिवसातील ही सर्वांत मोठी घसरण आहे. त्या दिवशी रेल्वे अर्थसंकल्पानंतर बाजार ५१८ अंकांनी कोसळला होता. कालही बाजाराने १९२.४५ अंकांची डुबकी मारली होती. शुक्रवारी व्यावसायिक सप्ताहाची समाप्ती झाली. या सप्ताहाच्या काळात सेन्सेक्स ६४६ अंकांनी खाली आला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी ७,६00 अंकांच्या खाली आला. दिवसअखेरीस ११८.७0 अंकांची घसरण नोंदवून तो ७,६0२.६0 अंकांवर बंद झाला. दिवसभर तो ७,७१८.७0 ते ७,५९३.९0 अंकांच्या मध्ये खाली-वर होताना दिसून आला. युरोपीय शेअर बाजारांतही आज मंदीची चाल दिसून आली. सकाळच्या सत्रात बाजार जवळपास १ ते २ टक्के खाली चालत होते. इतर आशियाई बाजार सुमारे १ टक्क्यांनी खाली आले. (प्रतिनिधी)