Join us

तिस-या दिवशीही सोने-चांदी मंदीतच

By admin | Updated: July 17, 2014 00:24 IST

राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या. १५५ रुपयांनी उतरलेले

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमती घसरल्या. १५५ रुपयांनी उतरलेले सोने २८,१७५ रुपये तोळा झाले, तर ४00 रुपयांची घसरण सोसणारी चांदी ४४,८५0 रुपये किलो झाली.बाजारातील सूत्रांनी सांगितले की, स्टॉकिस्टांकडून झालेला विक्रीचा मारा आणि जागतिक पातळीवरील कमजोर कल यामुळे सराफा बाजार मंदीत आहे. आजच्या घसरणीनंतर जागतिक बाजारात सोने तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्यामुळे गुंतवणूकदार तिकडे वळला आहे. त्याचाही फटका सोन्याला बसला. शेअर बाजारातील तेजी हेही सराफा बाजारातील मंदीचे एक प्रमुख कारण आहे. न्यूयॉर्क येथील सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत सोन्याचा भाव 0.७ टक्क्यांनी कोसळून १,२९७.१0 डॉलर प्रति औंस झाला. १९ जून नंतरचा हा नीचांक आहे. चांदीचा भाव 0.१ टक्क्यांच्या घसरणीनंतर २0.८८ डॉलर प्रति औंस झाला. काल चांदीचा भाव २.५ टक्क्यांनी कोसळला होता. १५ एप्रिलनंतरचा हा सर्वाधिक नीचांक ठरला होता. राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे भाव अनुक्रमे २८,१७५ रुपये आणि २७,९७५ रुपये तोळा झाले. दोन्ही सोन्याच्या भावात १५५ रुपयांची घसरण झाली. ८ ग्रामच्या सोन्याच्या गिन्नीचा भाव १00 रुपयांनी कमी होऊन २४,८00 रुपये झाला. तयार चांदीचा भाव ४00 रुपयांनी कोसळून ४४,८५0 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव ३५0 रुपयांनी कोसळून ४४,७२५ रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव १ हजार रुपयांनी कमी होऊन खरेदीसाठी ७९,000 रुपये तर विक्रीसाठी ८0,000 रुपये शेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क)