Join us

केवळ १८ जणांकडे थकला ११५० कोटी रुपयांचा कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 02:37 IST

कर न भरणाऱ्या नागरिकांची नावे सार्वजनिक करण्याच्या आपल्या मोहिमेअंतर्गत आयकर विभागाने बुधवारी अशा १८ जणांची यादी जाहीर केली आहे. त्यांच्याकडे तब्बल ११५० कोटी रुपयांचा कर बाकी आहे.

नवी दिल्ली : कर न भरणाऱ्या नागरिकांची नावे सार्वजनिक करण्याच्या आपल्या मोहिमेअंतर्गत आयकर विभागाने बुधवारी अशा १८ जणांची यादी जाहीर केली आहे. त्यांच्याकडे तब्बल ११५० कोटी रुपयांचा कर बाकी आहे. आयकर विभागाकडून जारी करण्यात आलेली ही यादी अर्थमंत्रालयाने काही वृत्तपत्रांतूनही प्रकाशित केली आहे. यात त्या व्यक्तीचे अथवा कंपनीचे नाव, त्यांचा पत्ता, पॅन नंबर, एकूण रक्कम, उत्पन्नाचा स्रोत आदींचा समावेश आहे.मुंबईचे स्व. उदय एम. आचार्य आणि त्यांचे वारसदार अमूल आचार्य व भावना आचार्य यांच्याकडे ७७९.०४ कोटी रुपयांचा आयकर वा कंपनी कर बाकी आहे. या यादीमध्ये सोन्याचे, हिऱ्याचे व्यापारी यांचा समावेश आहे. अशा प्रकारची ही तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या १८ जणांनी आयकर आणि कॉर्पोरेट कर असा एकूण ११५२ कोटी रुपयांचा कर भरणा केला नाही. कर विभागाने या नोटीसमध्ये त्यांना तात्काळ कर भरण्यास सांगितले आहे, तर जनतेला त्यांच्याबाबतीत काही माहिती असल्यास त्यांनी ती सांगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. या यादीत ज्यांचे नाव आहे त्यात प्रामुख्याने अहमदाबाद येथील जग हित एक्स्पोर्टर्स प्रायव्हेट लिमिटेड (१८.५४ कोटी), जशूभाई ज्वेलर्स (३२.१३ कोटी), कल्याण ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड (१६.७७ कोटी), लिवरपूल रिटेल इंडिया लिमिटेड (३२.१६ कोटी), धरणेंद्र ओवरसीज लिमिटेड (१९.८७ कोटी)आणि प्रफुल्ल एम. अखनी (२९.११ कोटी) या थकबाकीदारांचा समावेश आहे, तर हैदराबाद येथील नेक्सॉट इन्फोटेक लिमिटेड (६८.२१ कोटी), भोपाळच्या ग्रेट मेटल्स प्रॉडक्टस् लिमिटेडकडे (१३.०१ कोटी) रुपयांची बाकी आहे. याशिवाय सुरतच्या साक्सी एक्स्पोर्टर्स (२६.७६ कोटी), करोल बाग दिल्लीच्या श्रीमती बिमला गुप्ता (१३.९६ कोटी), भोपाळची गरिमा मशिनरी प्रा.लि. (६.९८ कोटी), मुंबईची धीरेन अनंट्राई मोदी (१०.३३ कोटी), हेमंग सी. शाह (२२.५१ कोटी),मो. हाजी ऊर्फ युसूफ मोटारवाला (२२.३४ कोटी), चंदीगढची व्हिनस रेमेडीज प्रा.लि. (१५.२५ कोटी) इतकी कर थकबाकी आहे.