Join us  

१००० कॉर्पोरेट बॉसेसना बसणार अतिश्रीमंतांच्या कराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 5:13 AM

मुंबई : अर्थमंत्र्यांनी प्राप्तिकर अधिभार वाढवल्यामुळे देशातील जवळपास १००० कॉर्पोरेट बॉसेसना अधिक प्राप्तिकर भरावा लागणार आहे. त्यांच्या घोषणेमुळे वार्षिक ...

मुंबई : अर्थमंत्र्यांनी प्राप्तिकर अधिभार वाढवल्यामुळे देशातील जवळपास १००० कॉर्पोरेट बॉसेसना अधिक प्राप्तिकर भरावा लागणार आहे. त्यांच्या घोषणेमुळे वार्षिक दोन ते पाच कोटी उत्पन्नावरील आयकर ३९ टक्के झाला, तर पाच कोटी उत्पन्नावरील कर तब्बल ४३ टक्के झाला. देशात पाच कोटीपेक्षा अधिक वार्षिक पगार घेणारे ३६६ कंपनी उच्चाधिकारी आहेत तर दोन ते पाच कोटी ‘पॅकेज’ असणारे ५८८ कॉर्पोरेट बॉसेस आहेत. या ९५४ मंडळींना अधिभार वाढीचा फटका बसणार आहे.

या उच्चाधिकाऱ्यांमध्ये टेक-महिंद्रचे प्रबंध संचालक व सीईओ सी.पी. गुरनानी (वार्षिक पॅकेज १४६.२० कोटी), एल अँड टीचे अध्यक्ष ए एम नाईक (१३९.०० कोटी), सन टीव्हीचे अध्यक्ष कलानिधी मारन (८७.५० कोटी), कार्यकारी संचालक कावेरी कलानिधी मारन (८७ कोटी), हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष व प्रबंध संचालक पवनकांत मुंजाल (७५.४० कोटी), जेएसडब्ल्यू स्टीलचे अध्यक्ष व प्रबंध संचालक सज्जन जिंदल (६०.६० कोटी), अपोलो टायर्सचे अध्यक्ष व प्रबंध संचालक ओंकार कंवर (४५ कोटी), एचईजीचे अध्यक्ष व प्रबंध संचालक रवी झुनझुनवाला (४३.३० कोटी), अपोलो टायर्सचे उपाध्यक्ष नीरज कंवर (४२.०० कोटी) व श्री सिमेंटचे प्रबंध संचालक एच एम बांगूर (४२.६० कोटी) यांचा समावेश आहे.

देशात वार्षिक एक कोटीपेक्षा अधिक पगार घेणारे एकूण १७२० कॉर्पोरेट बॉसेस आहेत.