Join us  

टाटा ग्रुप मोठा धमाका करण्याच्या तयारीत; बिग बास्केटवर डोळा ठेवून रिलायन्सवर नेम

By हेमंत बावकर | Published: October 14, 2020 3:40 PM

TATA Group Retail : बिग बास्केट नवीन गुंतवणूकदार शोधत आहे. यामध्ये सिंगापूर सरकारची टेमासेक, अमेरिकेची जनरेशन पार्टनर्स, फिडेलिटी आणि टायबर्न कॅपिटल सारख्या कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे.

ठळक मुद्देटाटा समुहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये दिग्गज बहुराष्ट्रीय कंपनी वॉलमार्टकडून २० ते २५ अब्ज डॉलर (सुमारे १. ८५ लाख कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. बिग बास्केट नवीन गुंतवणूकदार शोधत आहे. अलीबाबाचे पाठबळ असलेली बिग बास्केट कोरोना काळात फुल फॉर्ममध्ये आली आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठा ग्रुप टाटानेअ‍ॅमेझॉन आणि मुकेश अंबानी यांच्या वेगाने वाढत असलेल्या रिटेल व्यवसायाला टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. टाटा ग्रुप ऑनलाईन ग्रॉसरी यूनिकॉर्न बिग बास्केट (Big Basket) विकत घेण्याच्या तयारीला लागला आहे. या महिन्याच्या शेवटी दोन्ही कंपन्यांमध्ये व्यवहार पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. 

टाटा ग्रुप बिग बास्केटमध्ये 20 टक्के हिस्सेदारी आणि त्यांच्या संचालक मंडळावर दोन सीट मागण्याची शक्यता आहे.  Financial Times ने याबाबतचे वृत्त दिले आहे. चीनची मोठी कंपनी अलीबाबाचे पाठबळ असलेली बिग बास्केट कोरोना काळात फुल फॉर्ममध्ये आली आहे. कोरोना काळात लोक घरातून बाहेर पडण्यास घाबरत आहेत. यामुळे दैनंदिन भाजीपाला, वस्तू या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम बिग बास्केट करत आहे. तसेच लोकही या वस्तू ऑनलाईन खरेदी करत आहेत. 

बिग बास्केट नवीन गुंतवणूकदार शोधत आहे. यामध्ये सिंगापूर सरकारची टेमासेक, अमेरिकेची जनरेशन पार्टनर्स, फिडेलिटी आणि टायबर्न कॅपिटल सारख्या कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे. कंपनी या व्यवहारातून 35 ते 40 कोटी डॉलर गोळा करण्याच्या विचारात आहे. यामुळे कंपनीचे व्हॅल्यूएशन 33 टक्के वाढून 2 अब्ज डॉलरवर जाऊ शकते. 

बिग बास्केटसोबत डील केल्यानंतर टाटाची डिजिटल बाजारात हजेरी वाढणार आहे. ते अॅमेझॉन आणि मुकेश अंबानी यांच्या रिटेल क्षेत्रातील वेगाला टक्कर देण्याच्या स्थितीमध्ये पोहोचणार आहे. ऑगस्टमध्ये रिलायन्सने किशोर बियाणी यांचा बिग बझार आणि अन्य कंपन्या खरेदी केल्या होत्या. 

टाटामध्येही होणार गुंतवणूक 

 टाटा समुहाच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये दिग्गज बहुराष्ट्रीय कंपनी वॉलमार्टकडून २० ते २५ अब्ज डॉलर (सुमारे १. ८५ लाख कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सध्या चर्चा सुरू आहे. मिंटने दिलेल्या वृत्तानुसार वॉलमार्ट आणि टाटा समूहामध्ये या संभाव्य कराराबाबत चर्चा सुरू आहे. यापूर्वी वॉलमार्टने २०१८ मध्ये फ्लिपकार्टमध्ये सुमारे १६ अब्ज डॉलरची गुंतवणूक करत ६६ टक्के भागीदारीची खरेदी केली होती. आता टाटा समूहासोबतचा वॉलमार्टचा करार हा फ्लिपकार्टपेक्षाही मोठा असण्याची शक्यता आहे. या करारासाठी वॉलमार्टकडून २० ते २५ हजार अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येण्याची शक्यता आहे. जर हा करार पूर्णत्वास गेला तर सुपरअ‍ॅप टाटा समूह आणि वॉलमार्टचा संयुक्त प्रकल्प ठरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :टाटामुकेश अंबानीअ‍ॅमेझॉन