Join us  

एटीएममधील रात्रीचा रोकड भरणा होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:03 AM

कॅश व्हॅन्स, कॅश व्हॉल्टवरील हल्ले, तसेच एटीएम व अंतर्गत फसवणुकीच्या प्रकारामुळे असुरक्षिततेची भावना वाढल्याची दखल घेत गृहमंत्रालयाने नवीन निर्देश जारी केले आहेत.

नवी दिल्ली : कॅश व्हॅन्स, कॅश व्हॉल्टवरील हल्ले, तसेच एटीएम व अंतर्गत फसवणुकीच्या प्रकारामुळे असुरक्षिततेची भावना वाढल्याची दखल घेत गृहमंत्रालयाने नवीन निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार ८ फेब्रुवारी २०१९ पासून शहरातील एटीएममध्ये रात्री ९ नंतर व ग्रामीण भागातील एटीएममध्ये सायंकाळी ६ नंतर रोकड भरली जाणार नाही. रोकड वाहतूक करणाऱ्या वाहनांसोबत दोन सशस्त्र रक्षक असतील.नक्षलवादी कारवायाग्रस्त भागातील एटीएममध्ये दुपारी चारपर्यंतच रोकड भरण्यात येणार आहे. रोकड वाहतूक करणाऱ्या खाजगी संस्था दिवसा भोजनाच्या सुटीआधी बँकांतून रोकड जमा करून चिलखती वाहनांतून चलनी नोटांची वाहतूक करतील, असे गृहमंत्रालयाने अधिसूचनेत म्हटले आहे. देशभरात ८ हजार खाजगी वाहने दररोज १५ हजार कोटी रुपयांच्या रोख रकमेची वाहतूक करतात.रोकड वाहतूक करणाऱ्या संस्थांना आवश्यक संख्येत प्रशिक्षित कर्मचाºयांसह सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी लागेल. तसेच प्रत्येक कॅश व्हॅनसाठी एक चालक, दोन सशस्त्र सुरक्षारक्षक, दोन एटीएम अधिकारी किंवा अभिरक्षक असेल. रोकड वाहतुकीदरम्यान कॅश व्हॅनमध्ये चालकासोबत एक व व्हॅनच्या मागच्या भागात एक सशस्त्र सुरक्षारक्षक असावा. रोकड भरताना आणि काढताना नैसर्गिक विधी, चहापाणी किंवा भोजनाच्या वेळी कॅश व्हॅनमध्ये किमान एक सशस्त्र सुरक्षारक्षक असेल.रोख रकमेच्या वाहतुकीसाठी सुरक्षारक्षक म्हणून माजी सैनिकांना प्राधान्य दिले जावे. रोख रकमेची वाहतूक करणारी वाहने जीएपीएस उपकरणांसह सज्ज असावीती. प्रत्येक फेरीत पाच कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम नसावी. पोलीस चौकशी, आधार, पत्त्याबाबत शहानिशा आदी पार्श्वभूमीची माहिती करून घेतल्याशिवाय सुरक्षा संस्थेला रोकड वाहतुकीसाठी कोणत्याही व्यक्तीची नियुक्ती करता येणार नाही.रोख रक्कम असलेल्या प्रत्येक पेट्या स्वतंत्र साखळीने बांधलेल्या असाव्यात. या पेट्यांची कुलुपेही स्वतंत्र रक्षक किंवा एटीएम अधिकाºयांकडे असावी. व्हॅनमध्ये जीएसएम आधारित आॅटो डायलर व एक सुरक्षा अलार्म (धोक्याची सूचना देणारा भोंगा) असावा. हल्ल्याच्या स्थितीत त्वरित कारवाई करण्यासाठी कॅश व्हॅन भोंगा, अग्निरोधक आणि आपत्तीदर्शक दिव्यांनी सज्ज असावी.

टॅग्स :एटीएमबँकबँकिंग क्षेत्र