भारतीय रिझर्व्ह बॅँकेने दिलेल्या काही सवलती, आगामी धोरणामध्ये व्याजदरात कपात होण्याची वाढलेली आशा, चलनवाढीच्या दरात झालेली घट, देशाच्या निर्यातीत सलग दुसऱ्या महिन्यात झालेली वाढ, खनिज तेलाचे कमी झालेले दर अशा चांगल्या वातावरणामुळे मुंबई शेअर बाजारात गत सप्ताहात चांगली वाढ झालेली दिसून आली. बाजाराचा संवेदनशील निर्देशांक तसेच निफ्टीमध्ये वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक गत सप्ताहात २४,८९२ ते २५,७१३ अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो २५,६४१.५६ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहाच्या बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ६१७.२१ अंश म्हणजेच २.४७ टक्क्यांनी वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २०४.३० अंशांनी वाढून ७६६३.९० अंशांवर बंद झाला. मिडकॅप तसेच स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये अनुक्रमे १.३ टक्के आणि ५.१ टक्क्यांनी वाढ झाली. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन वाढीचा दर ५.४३ टक्क्यांवर आला आहे. गेल्या चार महिन्यातील हा निचांक आहे. त्याचप्रमाणे ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दरही जून महिन्यात ७.३१ टक्क्यांवर आला आहे.अन्नधान्याच्या किमतीत झालेली वाढ आणि कांद्याच्या घटलेल्या किमतीमुळे चलनवाढीचा दर कमी झाल्याचे सांगितले जाते. देशाच्या निर्यातीमध्ये वाढ झाली आहे. सलग दुसऱ्या महिन्यात निर्यातवाढीने दुहेरी संख्या गाठली आहे. जून महिन्यात निर्यातीमध्ये १०.२२ टक्क्यांनी वाढ झाली. त्याचप्रमाणे देशाची आयातही ८.३३ टक्क्यांनी वाढली आहे. आयातीपेक्षा निर्यातीत अधिक वाढ झाल्याने आयात-निर्यात व्यापाराचा समतोल काहीसा राखला जात आहे. भारतीय रिझर्व्ह बॅँकेने बॅँकांना प्राथमिकता क्षेत्राला कर्ज देताना रोख राखीव प्रमाण कायम राखण्याची अट शिथिल केली आहे. अर्थमंत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे बॅँकांच्या समभागात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली. चलनवाढीच्या दरात घट झाल्याने आगामी पतधोरणामध्ये व्याज दरात कपात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बॅँकांच्या समभागांना वाढीव मागणी दिसून आली. रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर सप्ताहाच्या अखेरीस पाडण्यात आलेले विमान तसेच गाझा पट्टीत सुरू असलेला हिंसाचार यामुळे राजकीय वातावरण तापलेले असले तरी, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या दरामध्ये घट झाली आहे. यामुळे बाजारात तेल आस्थापनांचे समभाग तेजीत असलेले दिसून आले. वित्तसंस्थांनीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली.
शेअर बाजाराने घेतली पुन्हा जोरदार उसळी
By admin | Updated: July 21, 2014 02:27 IST