Join us  

पीएनबी घोटाळ्यामुळे हादरला शेअर बाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 2:20 AM

पंजाब नॅशनल बॅँकेतील कथित गैरव्यवहाराच्या वृत्ताने शेअर बाजार हादरला आहे. त्याचबरोबर, वाढणाºया इंधनाच्या किमतींमुळेही बाजाराला चिंता लागली आहे

शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशीपंजाब नॅशनल बॅँकेतील कथित गैरव्यवहाराच्या वृत्ताने शेअर बाजार हादरला आहे. त्याचबरोबर, वाढणाºया इंधनाच्या किमतींमुळेही बाजाराला चिंता लागली आहे. बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने सप्ताहाच्या अखेरीस अल्पशी का होईना, वाढ दाखविली असली, तरी अन्य निर्देशांक मात्र लाल रंगामध्ये बंद झाले आहेत. बाजारात परकीय वित्तसंस्थांनी विक्रीचा मोठा धडाका लावलेला दिसून आला.मुंबई शेअर बाजारामध्ये सप्ताहाचा प्रारंभ ३४२०३.३४ अशा वाढीव पातळीने झाला. पहिल्या दिवशी निर्देशांकाने चांगलीच वाढ दिली. त्यानंतर, पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा उघड झाल्याने त्याचा बाजारावर विपरित परिणाम झाला. संवेदनशील निर्देशांक सप्ताहाच्या अखेरीस ३४०१०.७६ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये अवघ्या ५ अंशांची म्हणजेच ०.०१ टक्का वाढ झाली.या निर्देशांकाव्यतिरिक्त बाजाराचे जवळपास सर्वच निर्देशांक खाली आले. राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) २.६५ अंशांनी घसरून १०४५२.३० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ३२.५६ आणि २१२.३६ अंशांनी घट झाली.घाऊक मूल्य निर्देशांकावर आधारित चलनवाढीचा दर जानेवारी महिन्यात कमी झाला असला, तरी आयात-निर्यात व्यापारातील तूट मात्र वाढून ६५ टक्क्यांवर पोहोचली आहे. आंतरराष्टÑीय बाजारपेठेमध्ये इंधनाच्या दरामध्ये वाढ होत असल्याने त्याचा प्रभाव भारताच्या आयात-निर्यातीवर होणार असल्याच्या शक्यतेने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. दरम्यान, बाजारात परकीय वित्तसंस्थांनी मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीचा सपाटा लावला आहे. गतसप्ताहात या संस्थांनी २८.५ अब्ज रुपयांची विक्री केली. देशांतर्गत वित्तीय संस्थांनी सप्ताहामध्ये २३.७ अब्ज रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे. मात्र, बाजारात भीतीमुळेच अस्वलाचा संचार दिसून आला.

टॅग्स :नीरव मोदीपंजाब नॅशनल बँक घोटाळापंजाब नॅशनल बँक