Join us

शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण

By admin | Updated: April 18, 2015 00:02 IST

टेक्नॉलॉजी आणि आरोग्य क्षेत्रात जोरदार विक्री झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारांत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली.

मुंबई : टेक्नॉलॉजी आणि आरोग्य क्षेत्रात जोरदार विक्री झाल्यामुळे भारतीय शेअर बाजारांत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजार २२३.९४ अंकांनी घसरून २८,४४२.१0 अंकांवर बंद झाला. हा दोन आठवड्यांचा नीचांक आहे. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स गेल्या तीन सत्रांत ६0२.३४ अंकांनी घसरला आहे. सोमवारी सेन्सेक्सने २९ हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर तो घसरणीला लागला आहे. टीसीएसचा समभाग ४.२२ टक्क्यांनी घसरला. कंपनीची आॅक्टोबरनंतरची ही सर्वांत मोठी घसरण ठरली आहे. मार्चला संपलेल्या तिमाहीत कंपनीची कामगिरी अपेक्षेप्रमाणे राहिली नाही. त्याचा फटका बाजाराला बसला आहे. खरे म्हणजे सकाळी सेन्सेक्स २८,६८२.९७ अंकांवर तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो आणखी वर चढून २८,६९६.१९ अंकांवर गेला. आरआयएलच्या समभागांनी चांगली कामगिरी केल्यामुळे सेन्सेक्स वर चढला होता. आयटी क्षेत्रातील कंपन्यांनी मात्र ही वाढ घालविली. प्रचंड विक्रीचा मारा या कंपन्यांत झाला. त्यामुळे एका क्षणी सेन्सेक्स २८,४0३.७६ अंकांपर्यंत खाली आला होता. सत्र अखेरीस २२३.९४ अंकांची अथवा 0.७८ टक्क्यांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २८,४४२.१0 अंकांवर बंद झाला. १ एप्रिल रोजी सेन्सेक्स २८,२६0.१४ अंकांवर बंद झाला होता. ५0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १00.७0 अंकांनी अथवा १.१६ टक्क्यांनी घसरून ८,६0६.00 अंकांवर बंद झाला. त्याआधी तो दिवसभर ८,६९९.८५ आणि ८,५९६.७0 अंकांच्या मध्ये झुलताना दिसून आला. रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग वाढून ९४३.८0 रुपयांपर्यंत वाढला. मार्चला संपलेल्या तिमाहीतील कंपनीची आकडेवारी सायंकाळी जाहीर होणार होती. या तिमाहीत कंपनी चांगली कामगिरी करील, असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटत होता. त्यामुळे कंपनीचा समभाग वाढला. शेवटच्या टप्प्यात मात्र मोठ्या प्रमाणात नफा वसुली झाल्यामुळे रिलायन्सचा समभाग ९२६.८५ रुपयांवर बंद झाला. शुक्रवारच्या सत्रात घसरणीचा सामना कराव्या लागलेल्या कंपन्यांत विप्रो, इन्फोसिस, सन फार्मा, अ‍ॅक्सिस बँक, भारती एअरटेल, गेल, बजाज आॅटो, हीरो मोटोकॉर्प आणि एचडीएफसी बँक यांचा समावेश आहे. रिलायन्ससह टाटा स्टील, सेसा स्टरलाईट, हिंदाल्को, भेल, एनटीपीसी, टाटा पॉवर आणि हिंद युनिलिव्हर यांचे समभाग वाढले. आशियाई बाजारात घसरणीचा कल दिसून आला. या उलट युरोपीय बाजारांत मात्र सकाळी तेजीचा कल दिसत होता. (वृत्तसंस्था)४मुंबई : अक्षय तृतीयेच्या दिवशी गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडस् (इटीएफ) मध्ये व्यवसाय करण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात अधिक वेळ काम चालणार आहे. अक्षय तृतीया २१ एप्रिल रोजी असून त्या दिवशी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत व्यवसाय चालेल.४मुंबई शेअर बाजाराने अक्षय तृतीयेच्या दिवशी होणाऱ्या सर्व सौद्यांवरील खरेदी-विक्री शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे. ४साडेचार वाजता गोल्ड ईटीएफमध्ये व्यवसाय करण्यासाठी सत्र सुरू होईल. ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालेल.