मुंबई : अत्यंत अस्थिर वातावरणात मंगळवारी शेअर बाजारांत अल्प प्रमाणात वाढ दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २९ अंकांनी वाढून पुन्हा एकदा २९ हजार अंकांच्या वर चढला. तीन दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी वातावरण अनिश्चित बनल्यामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे.मागील दोन सत्रांत शेअर बाजारांत घसरण झाली होती. या दोन दिवसांत सेन्सेक्सने ४८७.१६ अंक गमावले होते. या घसरणीला मंगळवारी ब्रेक लागला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स २९.५५ अंकांनी वाढून २९,00४.६६ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्स दिवसभर २९,१३0.६७ ते २८,८७५.९४ अंकांच्या दरम्यान खाली-वर होत होता. ५0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ७.१५ अंकांनी वाढून ८,७६२.१0 अंकांवर बंद झाला. त्या आधी तो ८,८00.५0 ते ८,७२६.७५ या अंकांदरम्यान खाली-वर होत होता. गुरुवारी रेल्वे अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण सादर होईल. शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईल. त्या आधी देशाचे आर्थिक वातावरण बरेचसे अस्थिर असल्याचे शेअर बाजारात दिसून आले. तत्पूर्वी, काल विदेशी गुंतवणूकदारांनी ६0१.९१ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. स्वदेशी गुंतवणूकदारांनी मात्र १६३.७९ कोटी रुपयांचे समभाग विक्री केले.हिंदुस्तान युनिलिव्हरच्या समभागांना सर्वाधिक लाभ झाला. तेजीत असलेल्या बड्या कंपन्यांत आयटीसी, एलअँडटी, भेल, सिप्ला, गेल, मारुती सुझुकी, विप्रो, अॅक्सिस बँक आणि इन्फोसिस यांचा समावेश आहे. या उलट सेसा स्टरलाईट, ओएनजीसी, टाटा स्टील, टाटा मोटर्स, आरआयएल, भारती एअरटेल, टाटा पॉवर, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को यांचा समावेश आहे.
शेअर बाजार पुन्हा एकदा २९ हजारांवर
By admin | Updated: February 25, 2015 00:22 IST