Join us  

स्मार्टफोन बाजाराची वृद्धी असेल दोन अंकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 4:59 AM

भारतीय स्मार्टफोन बाजाराचा वृद्धीदर यंदाही दोनअंकी राहील, असे इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन (आयडीसी) इंडियाच्या विश्लेषकांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारतीय स्मार्टफोन बाजाराचा वृद्धीदर यंदाही दोनअंकी राहील, असे इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन (आयडीसी) इंडियाच्या विश्लेषकांनी म्हटले आहे. आयडीसीने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते मार्च या तिमाहीत ३0 दशलक्ष स्मार्टफोन भारतात आले. या तिमाहीतील वृद्धी ११ टक्के राहिली. ३0 टक्के हिस्सेदारीसह शिओमी पहिल्या स्थानी, २५ टक्के हिस्सेदारीसह सॅमसंग दुसऱ्या स्थानी आहे. टॉप-५ विक्रेत्यांत ओप्पो, विवो आणि ट्रन्शन यांचा समावेश आहे.४ जी फोन बाजार तिमाही आधारावर ५0 टक्के वाढ दर्शवीत आहे. जिओने याला मोठी गती दिलेली आहे. फिचर फोन विभागात जिओची हिस्सेदारी ३८.४ टक्के आहे. त्याखालोखाल सॅमसंगची १0.४ टक्के, ट्रन्शनची ७.९ टक्के, लावाची ६ टक्के आणि मायक्रोमॅक्सची ४.७ टक्के हिस्सेदारी आहे.आयडीसीचे बाजार विश्लेषक जयपाल सिंग यांनी सांगितले की, भारतीय बाजारातील अनेक घटकांमुळे वृद्धीदर दोनअंकी राहण्यास मदत होत आहे. स्मार्टफोनची लोकप्रियता, स्वस्त फोनवर उत्पादकांचा भर, फोन अधिक परवडणारे करतानाच कर्ज योजनांकडे दिलेले लक्ष, प्रमुख उत्पादकांनी आॅफलाइन विस्ताराकडे पुरविलेले लक्ष आणि आॅनलाइन विक्रीला मिळालेला पाठिंबा यामुळे वृद्धीला बळ मिळाले आहे. कंपन्यांनी उच्च पातळीवरील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने भारतातच उत्पादित करावीत यासाठी सरकार आग्रही आहे. त्यामुळे आयातीवर अधिक कर लावण्यात आला आहे. परिणामी उत्पादकांच्या नफ्यावर ताण येत आहे.

टॅग्स :मोबाइल