Join us  

नीरव मोदीने वापरले बहिणीचे खाते, दुबईतील बोगस कंपन्यांचा उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 12:49 AM

आघाडीचा हिरे व्यावसायिक नीरव मोदीने १३,५०० कोटी रुपयांपैकी ८५० कोटी रुपये मोठ्या चलाखीने बहिण पूर्वी मेहता हिच्या खात्यात वळते केल्याचे उघड झाले आहे.

मुंबई : आघाडीचा हिरे व्यावसायिक नीरव मोदीने १३,५०० कोटी रुपयांपैकी ८५० कोटी रुपये मोठ्या चलाखीने बहिण पूर्वी मेहता हिच्या खात्यात वळते केल्याचे उघड झाले आहे. यासाठी त्याने विदेशातील ‘शेल’ कंपन्यांचा उपयोग केला. पूर्वी मेहताच्या वैयक्तिक खात्याचा मोदीने हुशारीने उपयोग केला होता, हे तीन प्रकरणांमधून तपास यंत्रणांना दिसून आले आहे. पूर्वी मेहता हिची दुबईमध्ये फाइन क्लासिक एफझेडई कंपनी आहे. मोदीने एका बनावट कंपनीद्वारे ४४५ कोटी रुपये (६.५० कोटी डॉलर्स) फाइन क्लासिककडे वळविले.या कंपनीने मोदीच्या हाँगकाँगमधील फायरस्टार होल्डिंग्समध्ये ती रक्कम गुंतवत त्यांचे शेअर्स खरेदी केले. हे शेअर्स फाइन क्लासिकने पूर्वी मेहताच्या नावे वळते केले. त्यानंतर, पूर्वीने शेअर्सची विक्री केल्याने ४४५ कोटी रुपये तिच्या वैयक्तिक खात्यात जमा झाले. पूर्वी मेहताच्या मालकीच्या फाइन क्लासिक कंपनीने मोदीच्या तीन कंपन्यांना २३८ कोटी रुपयांचे (३.५० कोटी डॉलर्स) कर्ज दिल्याचे कागदोपत्री दाखविले. नंतर मोदीने त्याच्याकडील रक्कम पूर्वी हिच्या कंपनीकडे वळती करून कर्ज फेडल्याचे दाखविले, पण ही रक्कम पूर्वी हिच्या वैयक्तिकखात्यात जमा केली.दुबईतील बनावट कंपनीमार्फत मोदीने २०४ कोटी रुपये (३ कोटी डॉलर्स) पूर्वीचा पती मयंकच्या खात्यात जमा केले. मयंकने ही रक्कम पूर्वीला ‘भेट’ म्हणून दिली. त्यापैकी १३६ कोटी रुपयांची पूर्वीने बँक आॅफ इंडियात मुदत ठेव केली. त्या आधारे तिने इंग्लंडमधील बँकेकडून कर्ज घेतले. या कर्जाची रक्कम तीन वर्षे वापरली. त्यानंतर, कर्ज फेडून खाते बंद केले.>आणखी एक एफआयआररद्द केलेल्या भारतीय पासपोर्टच्या आधारे नीरव मोदीने १२ जूनपर्यंत प्रवास केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे सीबीआय मोदीविरुद्ध आणखी एक एफआयआर करण्याच्या विचारात आहे.

टॅग्स :नीरव मोदीपंजाब नॅशनल बँक घोटाळा