Join us

शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपदासाठी चंद्रदीप नरके आघाडीवर?

By admin | Updated: November 1, 2014 23:14 IST

* आमदार चंद्रदीप नरकेंच्या नावाला जिल्हा शिवसेना पदाधिकार्‍यांकडून पक्षश्रेष्ठींकडे साकडे

* आमदार चंद्रदीप नरकेंच्या नावाला जिल्हा शिवसेना पदाधिकार्‍यांकडून पक्षश्रेष्ठींकडे साकडे
* सहकार क्षेत्रात आमदार नरकेंची असणारी प्रतिमा ठरणार फायद्याची
* कॉँग्रेसच्या ग्रामीण भागातील तटबंदीला आमदार चंद्रदीप नरकेंकडून भगदाड पाडण्याचे काम.
प्रकाश पाटील / कोपार्डे : कॉँग्रेसचे मातब्बर उमेदवार जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यावर दुसर्‍यांदा विजय मिळवत आमदार चंद्रदीप नरकेंनी कॉँग्रेसची भक्कम तटबंदी असणार्‍या कोल्हापूरच्या पश्चिम भागाला भगदाड पाडण्याचे मोठे काम केले आहे. त्याचबरोबर जिल्‘ातील शिवसेना पदाधिकारी यांच्याबरोबर असणारे आमदार नरकेंचे जिव्हाळ्याचे संबंध व सहकारात असणारी त्यांची प्रतिमा शिवसेनेतील इतर कोणत्याही नेत्यांकडे नसल्याने मंत्रिपदासाठी आमदार चंद्रदीप नरके यांचे नाव आघाडीवर आहे.
२००९ मध्ये करवीर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेचा पर्याय निवडत जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली. पी. एन. यांनी आमदार नरकेंना बेदखल समजले. मात्र आमदार नरकेंच्या राजकीय कुटनितीने पी. एन. पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सहकारात काम करणारा एक चेहरा आमदार नरकेंच्या रूपाने शिवसेनेला मिळाला.
यानंतर मात्र आमदार चंद्रदीप नरके यांनी ग्रामीण भागात शिवसेना वाढविण्याचा सपाटा लावला. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कधी नव्हते एवढे शिवसेनेचे सदस्य निवडून आणण्यात यश मिळवले. यानंतर अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी जिल्‘ातील इतर शिवसेना आमदारांपेक्षा मोठी आघाडी घेतली. जरी करवीरमधून प्रा. संजय मंडलिक यांना मताधिक्य कमी मिळाले असले, तरी जे मतदान मिळाले त्या मतदानात आमदार चंद्रदीप नरके यांचा सिंहाचा वाटा असल्याचे खुद्द प्रा. संजय मंडलिक यांनी मान्य केले होते.
एवढेच नाही तर आमदार चंद्रदीप नरके यांनी कुंभी-कासारी सह. साखर कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांची सहकारात असणारी प्रतिमा शिवसेनेला कॅश करून घ्यावयाची आहे. जिल्‘ातील शिवसैनिकांना एकवटत टोलविरोधी त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका ग्रामीण भागात शिवसैनिकांना भावली तर आहेच त्याशिवाय कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव केल्याने शिवसैनिकांत नवचैतन्य पसरले आहे.
कामात आक्रमक असणार्‍या आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांबरोबर कधीही पंगा घेतला नाही. सर्व जिल्हा शिवसेना पदाधिकार्‍यांनीच उद्धव ठाकरे यांचेकडे आमदार नरके यांना मंत्रिपद देण्यासाठी साकडे घातल्याचे समजते.