शेअर बाजारात गेल्या आठवड्यात देशातील 10 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी पाच कंपन्यांच्या एकूण बाजार मूल्यात (मार्केट कॅप) तब्बल ₹72,284.74 कोटींची लक्षणीय वाढ नोंदवली गेली. यावेळी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला (RIL) मागे टाकत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस या दोन आयटी कंपन्या सर्वाधिक फायद्यात राहिल्या. महत्वाचे म्हणजे, गत अनेक अठवड्यांपर्यंत रिलायन्स इंडस्ट्रीज आघाडीवर होती.
गेल्या आठवड्यात भारती एअरटेल, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि बजाज फायनान्स या पाच कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये जबरदस्त वाढ झाली. तर रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), लार्सन अँड टुब्रो (L&T) आणि एलआयसी (LIC) या पाच कंपन्यांच्या मूल्यांकनात घसरण दिसून आली.
कोणत्या कंपनीला किती फायदा झाला? -
टीसीएसने सर्वाधिक ₹35,909.52 कोटी रुपयांची वाढ नोंदवली. याच बरोबर टीसीएसचे एकूण मार्केट कॅप ₹11,71,862.37 कोटींवर पोहोचले. इन्फोसिसने ₹23,404.55 कोटींची वाढ नोंदवली. तिचे मार्केट कॅप ₹6,71,366.53 कोटींवर पोहोचले. बजाज फायनान्सने ₹6,720.28 कोटीची वाढ नोंदवली, तिचे बाजार मूल्य 6,52,396.39 कोटी रुपयांवर पोहोचले. याशिवाय भारती एअरटेलचे बाजार मूल्य ₹3,791.9 कोटींच्या वाढीसह, 1201832.74 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर आयसीआयसीआय बँकेच्या मार्केट कॅपमध्ये ₹2,458.49 कोटींची वाढ झाली असून कंपनीचे बाजारमूल्य 995184.46 वर पोहोचले आहे.
या कंपन्यांना झाला घाटा -
महत्वाचे म्हणजे, रिलायन्स इंडस्ट्रीजला ₹35,116.76 कोटींच्या घसरणीसह सर्वाधिक फटका बसला. आता कंपनीचे बाजारमूल्य ₹20,85,218.71 कोटी एवढे आहे. मात्र असे असले तरी, देशातील सर्वात मूल्यवान कंपनी हीच आहे.एलआयसीचे ₹15,559.49 कोटींचे नुकसान झाले, तर एसबीआयचे मूल्यांकन ₹7,522.96 कोटींनी घसरले. एचडीएफसी बँक आणि एल अँड टी यांच्या मूल्यांकनात अनुक्रमे ₹5,724.03 कोटी आणि ₹4,185.39 कोटींची घसरण झाली.
शेअर बाजारात मोठ्या कंपन्यांचे प्रदर्शन सर्वसामान्य राहिले असले, तरीही रिलायन्स इंडस्ट्रीज अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. तर एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, भारतीय स्टेट बँक, इन्फोसिस, बजाज फायनान्स, L&T आणि एलआयसीचा क्रमांक लागतो.
