Join us

सेन्सेक्स, निफ्टीची घसरण

By admin | Updated: December 2, 2014 00:10 IST

रिझर्व्ह बँकेचा पतधोरण आढावा मंगळवारी जाहीर होणार आहे. त्याआधी सोमवारी शेअर बाजारात सतर्कतेचे वातावरण दिसून आले

मुंबई : रिझर्व्ह बँकेचा पतधोरण आढावा मंगळवारी जाहीर होणार आहे. त्याआधी सोमवारी शेअर बाजारात सतर्कतेचे वातावरण दिसून आले. खरेदीअभावी बाजार कोसळले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १३४.३७ अंकांनी कोसळून २८,५५९.६२ अंकांवर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा सीएनएक्स निफ्टी ३२.३५ अंकांनी घसरून ८,५५.९0 अंकांवर बंद झाला. सलग तीन सत्रांच्या तेजीनंतर बाजार घसरले आहेत. रिझर्व्ह बँक पतधोरण आढाव्यात व्याजदराबाबत नेमकी काय भूमिका घेते, याकडे बाजाराच्या नजरा लागल्या आहेत. आजच्या घसरणीत रिफानरी, ऊर्जा, धातू, भांडवली वस्तू या क्षेत्रांतील कंपन्यांना फटका बसला. या उलट ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू आणि आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वाढले. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अनेक वर्षांच्या नीचांकी पातळीवर गेल्यामुळे तेल कंपन्यांचे समभाग घसरले. हवाई इंधन स्वस्त झाल्यामुळे विमान कंपन्यांचे समभाग वाढले. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला एसअँडपी बीएसई सेन्सेक्स सकाळी मजबुतीने उघडला. एका क्षणी तो २८,८0९.६४ अंकांवर पोहोचला होता. त्यानंतर जागतिक बाजारात नरमाईचा कल असल्याचे स्पष्ट होऊ लागले आणि सेन्सेक्स उतरणीला लागला. सत्रअखेरीस १३४.३७ अंक अथवा 0.४७ अंकांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २८,५५९.६२ अंकांवर बंद झाला. आधीच्या तीन सत्रांत सेन्सेक्सने ३५५.९४ अंकांची वाढ मिळविली होती. ही वाढ १.२६ टक्के इतकी होती. ब्रोकरांनी सांगितले की, गुंतवणूकदार आज खरेदीत सहभागी झाले नाहीत. या उलट रिझर्व्ह बँकेच्या आढाव्याआधी नफा वसुलीला त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळे बाजार नरम होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील सीएनएक्स निफ्टीही सकाळी तेजीने उघडला. ८,६२३.00 अंकांच्या सार्वकालिक सर्वोच्च पातळीला स्पर्श केल्यानंतर तो घसरणीला लागला. सत्रअखेरीस ३२.२५ अंक अथवा 0.३८ टक्क्यांची घसरण नोंदवून निफ्टी ८,५५.९0 अंकांवर बंद झाला. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी शुक्रवारी शेअर बाजारात ९३५.८६ कोटी रुपयांची शेअर खरेदी केली. सेसा स्टरलाईट, एचडीएफसी, गेल, एनटीपीसी, भारती एअरटेल आणि एलअँडटी यांनाही घसरणीचा सामना करावा लागला. हीरो मोटोकॉर्प, एचयूएल, टीसीएस, अ‍ॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, सिप्ला आणि विप्रो या कंपन्यांचे शेअर्स वाढले. बाजाराचा एकूण व्याप नकारात्मक टप्प्यात राहिला. १,६७५ कंपन्यांचे शेअर्स कोसळले. १,२१८ कंपन्यांचे शेअर्स वाढले. बाजारातील एकूण उलाढाल ३,१५४.६५ कोटी राहिली. आदल्या दिवशी ती ३,८३४.९६ कोटी होती. (प्रतिनिधी)