Join us  

बॅँक समभागांमधील तेजीने सेन्सेक्स उंचावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:31 AM

अर्थमंत्र्यांनी बॅँकांना दिलेल्या पॅकेजनंतर विविध बॅँकांच्या समभागांना वाढलेली मागणी, परस्पर निधी आणि परकीय गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी

शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशीअर्थमंत्र्यांनी बॅँकांना दिलेल्या पॅकेजनंतर विविध बॅँकांच्या समभागांना वाढलेली मागणी, परस्पर निधी आणि परकीय गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने जैसे थे ठेवलेले व्याजदर, जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेले सकारात्मक वातावरण आणि विविध आस्थापनांचे आशादायक तिमाही निकाल, यामुळे गतसप्ताहात निर्देशांक वाढले. बॅँकांच्या जोरावर सेन्सेक्सने नवा उच्चांक गाठला.मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक गतसप्ताहात खाली-वर होताना दिसला. सप्ताहाच्या प्रारंभी तो वाढीव पातळीवर खुला झाला आणि शुक्रवारी बंद होताना त्याने नवीन उच्चांकही प्रस्थापित केला. मागील बंद निर्देशांकापेक्षा ५२८.३४ अंशांनी वाढून तो ३३६८५.५६ अंशांवर उच्चांकी बंद झाला. राष्टÑीय शेअर बाजारामध्येही तेजीचा माहोल दिसून आला. येथील निर्देशांक (निफ्टी) हा अधिक व्यापक पायावर आधारलेला असल्यामुळे त्यातील वाढ ही काहीशी कमी राहिली. मागील बंद सप्ताहाच्या बंद निर्देशांकामध्ये २२९.४५ अंशांची भर घालून निफ्टी १०४५२.५० अंशांवर बंद झाला. बाजाराचे क्षेत्रीय निर्देशांक असलेले मिडकॅप आणि स्मॉलकॅप हे निर्देशांकही १६७१३.२० (३७८.७५ अंशांची वाढ) आणि १७८५६.०३ (५५२.३७ अंशांची वाढ) असे बंद झाले. गेल्या पाच सप्ताहांपैकी चार सप्ताह निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले आहेत.बॅँकांना भांडवल देऊन सक्षम करण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा बाजारात नवा उत्साह आणणारी ठरली. त्याचबरोबर, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर जैसे थे ठेवण्याची घोषणा केली. भारतामधील आस्थापनांचे तिमाही निकाल आशादायक आणि अपेक्षेनुसार येण्याची अपेक्षा निर्माण झाल्यानेही खरेदी वाढलेली दिसून आली. निफ्टी ५० मधील ३२ आस्थापनांचे जाहीर झालेले तिमाही निकाल बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे अथवा त्यापेक्षा चांगले आल्याने भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा वाढीला लागण्याची शक्यता आहे.

टॅग्स :निर्देशांक