Join us

वर्षाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स अत्यल्प वाढला

By admin | Updated: January 2, 2016 08:36 IST

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात अत्यल्प वाढ नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४३ अंकांनी वाढून २६,१६0.९0 अंकांवर बंद झाला. हा बाजाराचा एक महिन्याचा नीचांक ठरला.

मुंबई : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात अत्यल्प वाढ नोंदली गेली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४३ अंकांनी वाढून २६,१६0.९0 अंकांवर बंद झाला. हा बाजाराचा एक महिन्याचा नीचांक ठरला. वाहन, भांडवली वस्तू आणि रिअल्टी या क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत झालेल्या खरेदीने बाजाराला तारले. शुक्रवारी संपलेला आठवडा सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांसाठी अनुक्रमे १.२५ टक्के आणि १.३0 टक्के वाढीचा राहिला. सलग तिसऱ्या आठवड्यात दोन्ही निर्देशांक वाढले. बहुतांश आंतरराष्ट्रीय बाजार नव्या वर्षानिमित्त बंद होते. सकाळी सेन्सेक्स नरमाईने उघडला होता. त्यानंतर काही चढ-उतारानंतर तो ४३.३६ अंक अथवा 0.१७ टक्का वाढ नोंदवून २६,१६0.९0 अंकांवर बंद झाला. १ डिसेंबर नंतरची ही सर्वोच्च पातळी ठरली. टाटा मोटर्सचा समभाग सर्वाधिक २.६६ टक्क्यांनी वाढला. त्या खालोखाल अदाणी पोर्टस्चा समभाग २.६५ टक्क्यांनी वाढला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १६.८५ अंकांनी अथवा 0.२१ टक्क्याने वाढून ७,९६३.२0 टक्के वाढला. ४ नोव्हेंबर रोजी तो या पातळीवर होता. दुसऱ्या श्रेणीतील कंपन्यांत मोठी खरेदी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे स्मॉलकॅप आणि मिडकॅप अनुक्रमे 0.९२ टक्का आणि 0.८८ टक्का वाढले. (वृत्तसंस्था)भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीचा समभाग 0.४३ टक्क्याने वाढला. मारुतीची विक्री डिसेंबरमध्ये ८.५ टक्क्यांनी वाढल्याचा लाभ कंपनीला मिळाला. टाटा मोटर्स, अशोक लेलँड आणि आयशर मोटर्स या वाहन कंपन्यांचे समभागही वाढले.क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई रिअल्टी निर्देशांक सर्वाधिक १.९९ टक्क्याने वाढला. त्याखालोखाल कॅपिटल गुड्स, आॅटो, पॉवर, पीएसयू, मेटल, बँकिंग या क्षेत्रांचे निर्देशांक वाढले.विमानाच्या इंधनाचे भाव सुमारे १0 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याने विमान वाहतूक कंपन्यांचे समभाग वाढले. स्पाईस जेट, इंटर ग्लोबल एव्हिएशन (इंडिगोची पालक कंपनी), जेट एअरवेज यांचे समभाग वाढले.