Join us

सेन्सेक्स ३0२ अंकांनी वाढला

By admin | Updated: April 2, 2015 06:11 IST

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारांनी तेजीची नोंद केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३0२.६५ अंकांनी वाढून २८,२६0.१४ अंकांवर बंद झाला

मुंबई : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारांनी तेजीची नोंद केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३0२.६५ अंकांनी वाढून २८,२६0.१४ अंकांवर बंद झाला. तसेच सेन्सेक्सने तीन आठवड्यांनंतर प्रथमच साप्ताहिक लाभही प्राप्त केला आहे. ३0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला सेन्सेक्स सकाळी २७,९५४.८६ अंकांवर किंचित घसरण नोंदवीत उघडला होता. त्यानंतर तो आणखी घसरून २७,८८९.0२ अंकांपर्यंत खाली आला. त्यानंतर मात्र बाजारात खरेदीचा जोर वाढला. पाहता पाहता सेन्सेक्सने मोठी भरारी घेतली. एका क्षणी तो २८,२९८.३४ अंकांवर गेला होता. सत्रअखेरीस २८,२६0.१४ अंकांवर तो बंद झाला. ३0२.६५ अंक अथवा १.0८ टक्क्यांची वाढ त्याने नोंदविली. ५0 कंपन्यांच्या समभागांचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,६00 अंकांच्या टप्प्यावर गेला. ९५.२५ अंकांची अथवा १.१२ टक्क्यांची वाढ नोंदवून निफ्टी ८,५८६.२५ अंकांवर बंद झाला. आजच्या तेजीचा सर्वाधिक ५.५१ टक्क्यांच्या तेजीचा लाभ सन फार्माला मिळाला. टाटा मोटर्स, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, हिंदाल्को, टाटा स्टील, आयटीसी आणि भारती एअरटेल यांनाही तेजीचा लाभ मिळाला. क्षेत्रनिहाय विचार करता बँकिंग क्षेत्राला सर्वाधिक २.३७ टक्के वाढीचा लाभ मिळाला.