मुंबई : सलग २ सत्रांतील मंदीनंतर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज पुन्हा उसळला. ३३१ अंकांची वाढ नोंदवून सेन्सेक्स २५,५२१.१९ अंकांवर बंद झाला. शेवटच्या काही तासांत आरआयएल, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी आणि एलअँडटी या कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. त्यामुळे सेन्सेक्सला बळ मिळाले.तेल आणि गॅस, बँकिंग तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी सकारात्मक कल दाखविला. त्यातच आंतरराष्ट्रीय पातळीवरही तेजीचा माहोल होता. याचा परिणाम म्हणून शेअर बाजारात तेजी परतली.३0 कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश असलेल्या सेन्सेक्सची सुरुवात मंदीनेच झाली होती. त्यानंतर तो आणखी घसरत गेला. २५,१0४.५0 अंकांपर्यंत तो घसरला होता. त्यानंतर शेवटच्या काही तासांत गुंतवणूकदार बाजारात परतले. मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाल्याने बाजाराने उसळी घेतली. दिवस अखेरीस ३३0.७१अंकांचा घसघशीत लाभ नोंदवीत सेन्सेक्स २५,५२१.१९ अंकांवर बंद झाला. ही वाढ सोमवारच्या बंदच्या तुलनेत १.३१ टक्के ठरली. आधीच्या दोन सत्रांत सेन्सेक्स मरगळीत होता. या दोन सत्रांत मिळून सेन्सेक्सने ३८५.७३ अंक गमावले. ठोक निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ५ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्यामुळे बाजारात निराशेचे वातावरण होते. त्यातच रुपयाचीही घसरण झाली. इराकमधील राजकीय संकटामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती वाढल्या. त्याचा परिणाम बाजारावर झाला होता. तथापि, आज बाजार या सावटातून अचानक सावरला.५0 कंपन्यांचा समावेश असलेला नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी ९८.१५ अंकांनी वर चढला. १.३0 टक्क्यांची वाढ नोंदविताना निफ्टी पुन्हा एकदा ७,६00 अंकांवर पोहोचला. दिवसअखेरीस तो ७,६३१.७0 अंकांवर बंद झाला. दिवसभर तो खाली वर होत होता. ७,५0९.२५ आणि ७,६३७.६0 अंकांच्या मध्ये तो झुलत असल्याचे दिसून आले. कोटक सिक्योरिटीजचे अर्थतज्ज्ञ दीपेन शाह यांनी सांगितले की, शेअर बाजारातील आजची तेजी आश्चर्यकारक आहे. काही शेअर्समध्ये मोठी खरेदी झाल्याचा हा परिणाम आहे, असे दिसते. त्या आधी सकाळी रुपयात घसरण झाली होती. दुपारपर्यंत रुपया थोडा सावरला. बँका आणि निर्यातदार यांच्या सहभागामुळे रुपयात सुधारणा झाली असावी, असे दिसते. एक डॉलरची किंमत ६0.५१ रुपये अशी झालेली होती. त्यात सुधारणा होऊन डॉलर ५९.९५ रुपयांना झाला. (प्रतिनिधी)
सेन्सेक्सने पुन्हा घेतली जोरदार उसळी
By admin | Updated: June 18, 2014 05:34 IST