Join us

विक्रीअभावी बी-बियाणे मार्केट ठप्प

By admin | Updated: July 1, 2014 21:43 IST

आठ दिवसांपासून शेतकरी फिरकेना

आठ दिवसांपासून शेतकरी फिरकेना
जिल्ह्यात ७५ कोटी २० लाखांचे बियाणे शिल्लक
खरिपाचे अर्थकारण कोलमडले
औरंगाबाद : पावसाने महिनाभर दडी मारल्याने खरिपाचे अर्थकारणच कोलमडले आहे. सुमारे ६५ कोटींचे बियाणे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खरेदी केले; पण पावसाने दगा दिल्याने शेतकर्‍यांनी पेरणीचे धाडस केलेच नाही. ज्यांनी धाडस केले त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. आजघडीला बाजारपेठेत ७० कोटींचे बियाणे थप्पीला लागले असून, गेल्या आठ दिवसांत एकही शेतकरी न फिरकल्याने बी-बियाणे मार्केटमध्ये भयाण शांतता पसरली आहे.
मागील वर्षी दुष्काळातही जून महिन्यात सरासरीइतका पाऊस पडला होता. मात्र, हा अपवाद वगळत मागील ७ वर्षांपासून जुलै महिन्यातच पाऊस पडला आहे. जून महिना संपूर्णपणे कोरडा गेला आहे. यंदाही इतिहासाची पुनरावृत्ती झाली असून, पाऊस एक महिना पुढे सरकला आहे. जून महिन्यात पावसाने मोठा ताण दिला आहे. परिणामी, खरिपाचे अर्थकारण यंदाही बिघडले आहे. निम्मे बी-बियाणे विक्रीविना बाजारात पडून आहे. खरेदीसाठी तर सोडाच; पण बियाणाचे भाव विचारण्यासाठी वितरकांना दिवसातून एकसुद्धा फोन येत नाही. यावरून बाजारपेठेतील गंभीर परिस्थितीची कल्पना येऊ शकते. बाजारपेठेत खरिपात कपाशीच्या १० ते १२ लाख पाकिटांची दरवर्षी विक्री होते. यात सुमारे ९० ते १०० कोटींची उलाढाल होत असते. १० ते १२ हजार क्विंटल मका बियाणाची विक्री होते, यात १८ ते २० कोटी रुपयांची उलाढाल होते, तर २ ते अडीच हजार क्विंटल बाजरी बियाणे विकले जाते. त्यातून ३ कोटी ५० लाख रुपयांची उलाढाल होत असते, अशी एकूण १२० ते १२५ कोटी रुपयांची उलाढाल खरिपात होते. यंदा जूनमध्ये पाऊस पडेल या आशेने काही शेतकर्‍यांनी सुरुवातीला बियाणे खरेदी केले. वितरकांच्या मते सुमारे ६८ लाख ८० हजार रुपयांचे बियाणे विक्री झाले. मात्र, जून उलटला तरीही पाऊस पडलाच नाही. यामुळे शेतकर्‍यांनी बियाणे पेरणीचे धाडस केलेच नाही. पाऊस पडल्यावर बियाणे खरेदी करू असा विचार करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. पावसाची शाश्वती नसल्याने त्यांनी बियाणे खरेदीसाठी अजूनही बाजारपेठेत पाऊल ठेवले नाही. परिणामी, जिल्ह्यात आजघडीला सुमारे ६५ ते ५२ कोटींचे बियाणे विक्रीविना शिल्लक राहिले आहे. आठवड्यात पाऊस पडला तर परिस्थिती बदलू शकते. मूग, उडीद पीक घेता येणार नाही; पण कपाशी, मका, तूर, बाजरी, सोयाबीनची पेरणी होईल. (जोड)