Join us  

सेन्सेक्सची उच्चांकी घोडदौड कायम

By admin | Published: August 27, 2014 1:45 AM

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी सुरुवातीला किरकोळ घसरणीसह अखेरीस ६ अंकांच्या माफक तेजीने नवी विक्रमी पातळी २६,४४२.८१ अंकावर बंद झाला

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स मंगळवारी सुरुवातीला किरकोळ घसरणीसह अखेरीस ६ अंकांच्या माफक तेजीने नवी विक्रमी पातळी २६,४४२.८१ अंकावर बंद झाला. आरोग्य सेवा आणि एफएमसीजी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मागणीमुळे सेन्सेक्समध्ये सलग चौथ्या सत्रात तेजी नोंदली गेली. धातू शेअर्समध्येही दिवसअखेरीस सुधारणा झाली.मुंबई शेअर बाजाराच्या ३० शेअर्सचा सेन्सेक्स घसरणीसह २६,३४९.८७ अंकावर उघडल्यानंतर २६,३१४.८९ अंकापर्यंत खाली आला. तथापि, अखेरच्या सत्रात मागणी झाल्याने सुरुवातीच्या हानीतून बाहेर पडत शेवटी ५.७९ अंक वा ०.०२ टक्क्यांच्या तेजीसह २६,४४२.८१ अंकावर बंद झाला. काल सेन्सेक्स २६,४३७.०२ अंकाच्या विक्रमी पातळीवर बंद झाला होता.तथापि, निफ्टी नव्या विक्रमी पातळीवर पोहोचल्यानंतर अखेरीस १.५५ अंक वा ०.०१ टक्क्यांनी घटून ७,९०४.७५ अंकावर आला. दिवसभराच्या व्यवहारात निफ्टी ७,८६२.४५ ते ७,९१५.४५ अंकादरम्यान राहिला.ब्रोकर्सनी सांगितले की, डेरिव्हेटिव्हज करारांच्या मासिक निपटाऱ्यापूर्वी सट्टेबाजांच्या शॉर्ट कव्हरिंगमुळेही बाजाराला मोठी मदत झाली. कोळसा खाणवाटपावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर बाजारात नकारात्मक धारणा होती. मात्र, गुंतवणूकदार या निर्णयाच्या संभाव्य परिणामापासून बाहेर पडले. भारतीय स्पर्धा आयोगाने टाटा मोटर्स, मारुती सुझुकी व महिंद्रा अँड महिंद्रा यासह १४ कार कंपन्यांवर २,५४५ कोटींचा दंड ठोठावला आहे. यामुळेही सुरुवातीला बाजारात विक्री झाल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)