Join us  

प्रशासकीय त्रुटींमुळे बँकांमध्ये घोटाळे- अरुंधती भट्टाचार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 5:46 AM

सरकारी बँकांमधील घोटाळ्यांचे मुख्य कारण प्रशासकीय त्रुटी हेच आहे, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी शुक्रवारी केले.

मुंबई : सरकारी बँकांमधील घोटाळ्यांचे मुख्य कारण प्रशासकीय त्रुटी हेच आहे, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी शुक्रवारी केले. बँकांनी खातेदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नये, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.मुंबई विद्यापीठाच्या जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज व इंडियन मर्चंट चेम्बर आॅफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीतर्फे प्रवीणचंद्र गांधी स्मृती व्याख्यानात ‘भारताच्या आर्थिक विकासासाठी बँकिंग’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यात घोटाळ्यांबाबत त्या म्हणाल्या, जेथे पैसा आला तेथे घोटाळा होतोच. हे घोटाळे केवळ भारतातच होतात, असे नाही. पण मोठ्या बँका क्वचितच घोटाळ्यांचे लक्ष्य ठरतात. घोटाळे टाळण्यासाठी बँकिंग प्रक्रियेची सातत्याने तपासणी करायला हवी. स्विफ्टच्या माध्यमातून हमीपत्राच्या आधारे घोटाळा झाला. याचे कारण स्विफ्ट आणि सीबीएस प्रणाली स्वतंत्र ठेवली गेली. या दोन्ही प्रणाली एकमेकांना पूरक ठेवल्यास घोटाळ्यांवर अंकुश येईल.सरकारी बँकांचे खासगीकरण होणारच. पण त्याआधी बँकांनी प्रशासन सुधारण्याची गरज आहे. खातेदार बिनधास्तपणे त्यांचा पैसा बँकेत ठेवतात. त्यांचा बँकेवर पूर्ण विश्वास असतो. मात्र केवळ प्रशासकीय त्रुटींमुळे घोटाळे होणे योग्य नाही. त्यातून बँकांवरील खातेदारांच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो. तो जाऊ न देण्याचे मोठे आव्हान सध्या केवळ सरकारीच नाही, तर खासगी व सहकारी बँकांसमोरही आहे, असेही त्यांनी नमूद केले.