Join us  

इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री ३० टक्क्यांपर्यंत वाढणार

By admin | Published: October 07, 2015 5:08 AM

एलजी, सॅमसंग आणि पॅनासोनिकसारख्या प्रमुख ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मात्या कंपन्यांना येत्या सणांच्या दिवसांत विक्रीमध्ये ३० टक्के वाढीची अपेक्षा आहे.

नवी दिल्ली : एलजी, सॅमसंग आणि पॅनासोनिकसारख्या प्रमुख ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मात्या कंपन्यांना येत्या सणांच्या दिवसांत विक्रीमध्ये ३० टक्के वाढीची अपेक्षा आहे. बँकांनी नुकतीच व्याजदरात कपात केल्यामुळेही विक्रीला प्रोत्साहन मिळेल असे त्यांना वाटत आहे.विक्री वाढविण्याच्या उद्देशाने या कंपन्या खात्रीच्या भेटवस्तू, स्मार्ट फोन, ब्लू रे प्लेयर्स आणि साऊंड सिस्टीम आदी उत्पादने उपलब्ध करून देतील.सॅमसंग इंडिया इलेक्ट्रॉनिक्सचे उत्पादन विपणन प्रमुख ऋषी सुरी यांनी सांगितले की, बाजारातील सुरुवातीचे संकेत सकारात्मक आहेत. येत्या सणांच्या दिवसांत बाजारपेठेच्या वाढीच्या तुलनेत आमची वाढ जास्त असेल. ग्राहकांच्या विचारांत झालेला बदल आणि नवनवीन आकर्षक उत्पादनांमुळे विक्री वाढण्याची आशा आहे. सॅमसंग कंपनी लवकरच ४० आणि ५० इंची दूरचित्रवाणी संच बाजारात आणणार आहे. सॅमसंगची स्पर्धक कंपनी एलजीलादेखील सण, उत्सवांच्या काळात विक्री चांगली होण्याची अपेक्षा आहे. एलजी इंडियाचे प्रमुख (कॉर्पोरेट मार्केटिंग) नीलाद्री दत्ता म्हणाले की, येत्या हंगामात आम्हाला विक्रीत २० ते २५ टक्केवाढीची अपेक्षा आहे. एलजीने सण, उत्सव सुरू व्हायच्या आधीच वेगवेगळ्या श्रेणींत नवनवी उत्पादने बाजारात आणली आहेत. त्यात ओएलईडी टीव्ही, वेब ओएस तंत्रज्ञानासह स्मार्ट टीव्ही, ड्यूअल डोअर-इन-डोअर फ्रीज आणि जेट स्प्रे तंत्रज्ञान वापरलेल्या वॉशिंग मशीनचा समावेश आहे. पॅनासोनिक इंडिया आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष शर्मा म्हणाले की, सणांच्या दिवसांत मार्केटिंगवर खर्च करण्यासाठी आम्ही ९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सध्या कन्झ्युमर फायनान्समार्फत ३० टक्के विक्री होते.