Russian Crude Oil: अमेरिकेकडून रशियाच्या प्रमुख तेल कंपन्यांवर लागू केलेल्या निर्बंधांनंतर भारताच्या रशियन कच्च्या तेलाच्या आयातीत मोठी घट नोंदवली गेली आहे. 21 नोव्हेंबरनंतर या आयातीचा आकडा जवळपास एक तृतीयांशाने कमी झाला असून, डिसेंबरमध्ये ही घसरण आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नोव्हेंबरमध्ये आयातीत विक्रमी वाढ, पण...
डेटा विश्लेषण कंपनी केप्लर (Kpler) च्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात भारतानेरशियाकडून सरासरी 18 लाख बॅरल प्रतिदिन कच्चे तेल आयात केले. हे भारताच्या एकूण कच्च्या तेल आयातीत 35% पेक्षा अधिक होते. ऑक्टोबरमध्ये हा आकडा 15–16 लाख बॅरल प्रतिदिन होता.
प्रतिबंध लागू होण्याआधी भारतीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात स्टॉकिंग केल्यामुळे नोव्हेंबर हा पाच महिन्यांतील सर्वाधिक आयात असलेला महिना ठरला.
केप्लरचे प्रमुख संशोधन विश्लेषक सुमित रितोलिया यांनी सांगितले की, 21 नोव्हेंबरपूर्वी आयात 19-20 लाख बॅरल प्रतिदिन होती. निर्बंधांच्या वेळापत्रकापूर्वी कंपन्यांनी माल जलद गतीने मागवला. प्रतिबंध लागू झाल्यानंतर आयात घटून 12.7 लाख बॅरल प्रतिदिन झाली, म्हणजे महिन्याच्या तुलनेत 5.7 लाख बॅरल प्रतिदिनची मोठी घट.
रितोलिया यांच्या अंदाजानुसार, सध्याच्या लोडिंग आणि जहाज हालचाली पाहता डिसेंबरमध्ये हा आकडा 10 लाख बॅरल प्रतिदिनपर्यंत खाली येऊ शकतो. पूर्वी केप्लरने अंदाज दिला होता की, आयात 8 लाख बॅरल प्रतिदिनपर्यंत घसरू शकते आणि तेथून स्थिर होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने 22 ऑक्टोबरला रशियन कंपन्यांवर घातले निर्बंध
22 ऑक्टोबर रोजी अमेरिकेने यूक्रेन युद्धासाठी निधी उभारण्याच्या रशियाच्या क्षमतेवर मर्यादा आणण्यासाठी रशियाच्या दोन मोठ्या तेल कंपन्या Rosneft आणि Lukoil यांच्यावर निर्बंध जाहीर केले.
