मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेने तिमाहीत तब्बल ८.२ टक्के वाढ नोंदवून विकासाची गती दाखवली असताना रुपयाने मात्र सोमवारी ८९.७९ ही इतिहासातील सर्वात नीचांकी पातळी गाठली आहे. पूर्वी २१ नोव्हेंबरला रुपया ८९.६६ या पातळीपर्यंत घसरला होता, तेव्हा त्यात ९८ पैशांची मोठी पडझड झाली होती. या घसरणीमुळे रुपया हा आशियातील सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक ठरला आहे.
वाढती व्यापार तूट, भारत आणि अमेरिकेत व्यापार करार होण्यास होत असलेला विलंब तसेच आरबीआयकडून हस्तक्षेप होत नसल्याने रुपयात घसरण होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
भारतीय शेअर बाजारात होत असलेली वाढ, सुधारलेला उत्पादन क्षेत्र निर्देशांक यांनीही रुपयाला सावरलेले नाही. ही घसरण अशीच चालू राहिल्यास देशाची आयात आणखी महाग होणार असून, महागाई वाढणार आहे.
दबाव नेमका का?
ट्रम्प यांनी भारतावर टैरिफ लादले आहे. करार अंतिम न झाल्याने व्यापार प्रवाह, विदेशी गुंतवणूक कमी झाले आहे.
या वर्षी परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून १६ अब्ज डॉलरहून अधिक गुंतवणूक काढून घेतल्याने बाजार स्थिर आहे.
अर्थतज्ज्ञांनी काय म्हटले?
रुपयाचे अवमूल्यन अपरिहार्य आहे. व्यापार करारात विलंब वाढला तर हा दबाव आणखी वाढू शकतो, असे जे. पी. मॉर्गनने म्हटले आहे.
व्यापार तूट सर्वकालीक उच्चांकावर
भारताची व्यापार तूट ऑक्टोबरमध्ये इतिहासातील सर्वाधिक झाली आहे. त्यामुळे रुपयात घसरण होत आहे.
रुपयाची ४० प्रमुख चलनांशी तुलना करणारा रिअल इफेक्टिव्ह एक्स्चेंज रेट ऑक्टोबरमध्ये ९७.४७ वर घसरून 'अंडरव्हॅल्यूड'मध्ये पोहोचला. यात रुपया घसरला.
