Join us  

सहेतुक करबुडव्यांना स्वत:च्या कंपन्यांवर बोली लावण्यास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 4:24 AM

हेतुत: कर्ज बुडविणा-या तसेच पैसा अन्यत्र वळविणा-या कंपनी संचालकांना दिवाळखोरीत निघालेल्या आपल्या कंपन्यांसाठी बोली लावण्याचा अधिकार राहणार नाही

मुंबई : हेतुत: कर्ज बुडविणा-या तसेच पैसा अन्यत्र वळविणा-या कंपनी संचालकांना दिवाळखोरीत निघालेल्या आपल्या कंपन्यांसाठी बोली लावण्याचा अधिकार राहणार नाही, असे प्रतिपादन स्टेट बँक आॅफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांनी केले. ज्यांनी मुद्दाम थकबाकी केलेली नाही, त्या कंपन्यांच्या संचालकांना मात्र बोलीचा अधिकार असेल, असेही त्यांनी सांगितले.दिवाळखोर कंपन्यांचा लिलाव करण्याच्या प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला आहे. कर्ज थकविणारे कंपनीचे संचालक आपल्याच कंपन्या सवलतीत खरेदी करण्यासाठी सरसावल्याचे चित्र समोर आल्यानंतर हा वाद निर्माण झाला आहे. नव्या ‘नादारी व दिवाळखोरी संहिते’नुसार राष्टÑीय कंपनी कायदा लवादाकडे आलेल्या काही प्रकरणांत इनोव्हेटिव्ह इंडस्ट्रीजचा समावेश आहे. इनोव्हेटिव्हसाठी ज्या काही निविदा आल्या, त्यात सर्वोत्तम निविदा कंपनीवरील कर्जात ७५ टक्के सूट मागणारी होती. एवढ्या मोठ्या कर्जावर पाणी सोडावे लागणार असल्यामुळे ही प्रक्रिया ठप्प झाली. कंपनीच्या संचालकांनाच कंपनी अशा प्रकारच्या आतबट्ट्यातील व्यवहारातून विकावी का, असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे.एखाद्या थकबाकीदारास आपलीच कंपनी लिलावाद्वारे अत्यल्प किमतीत खरेदी करू देणे नैतिकतेला धरून आहे का, असा प्रश्न रजनीश कुमार यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सांगितले की, नैतिकतेच्या मुद्द्याचे मला माहिती नाही; पण कायद्यानुसार त्यांना तसा अधिकार आहे.

टॅग्स :स्टेट बँक आॅफ इंडिया