नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने आपल्याकडे असलेला जुन्या सोन्याचा साठा बदलून त्याजागी नव्या शुद्ध सोन्याचा साठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोन्याच्या साठ्याचे प्रमाणीकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारताकडे ३१५ अब्ज डॉलर एवढा विदेशी चलन साठा असून यामध्ये २०.८ अब्ज डॉलरच्या सोन्याच्या साठ्याचा समावेश आहे. अधिकाधिक सोने हे नागपूरच्या भांडारात असून काही हिस्सा लंडनमध्ये ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यात बहुतांश सोने हे जुन्या काळातील आहे. काही सोने तर स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. या सोन्याची शुद्धता आजच्या प्रगत तंत्रज्ञानाने शुद्ध केलेल्या सोन्याच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे हा साठा बदलून त्याजागी आताच्या काळातील सोन्याचा साठा करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. सोन्याची ही अदलाबदली नामनिर्देशित बँकांच्या माध्यमातून केली जाणार आहे. भारतीय स्टेट बँकेसह सर्व नामनिर्देशित बँकांना रिझर्व्ह बँकेच्या वतीने सोन्याची आयात करता येईल. नंतर हे आयातीत शुद्ध सोन्याची रिझर्व्ह बँकेच्या भांडारातील सोन्याशी अदलाबदली केली जाईल. या योजनेनुसार, रिझर्व्ह बँक अशुद्ध सोन्याच्या बदल्यात एवढेच मूल्य असलेले शुद्ध सोने घेईल. सूत्रांच्या मते, या प्रक्रियेंतर्गत रिझर्व्ह बँकेजवळ उपलब्ध सोने आंतरराष्ट्रीय प्रमाणीकरण पातळीवर आणले जाईल. अदला-बदली प्रक्रियेच्या माध्यमातून आरबीआय हे सोने आपली आंतरराष्ट्रीय संरक्षक बँक आॅफ इंग्लंडकडे जमा करेल. रिझर्व्ह बँकेकडे २७ जूनपर्यंत २०.७९ अब्ज डॉलर एवढे मूल्य असलेले सोने होते. रिझर्व्ह बँक नामनिर्देशित बँकांच्या माध्यमातून आपल्याकडील जुने सोने स्थानिक बाजारात विक्री करेल आणि याच प्रमाणात सोन्याची आयात कमी केली जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)
रिझर्व्ह बँक जुन्या सोन्याचा साठा बदलणार
By admin | Updated: July 7, 2014 04:51 IST