Join us  

रिलायन्स, विप्रोने गाजविलेला सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:32 AM

मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील, तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकांनी गाठलेले नवीन उच्चांक, तसेच परकीय वित्तसंस्थांची खरेदी असतानाही झालेला

- प्रसाद गो. जोशी मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील, तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी या निर्देशांकांनी गाठलेले नवीन उच्चांक, तसेच परकीय वित्तसंस्थांची खरेदी असतानाही झालेला विक्रीचा मारा यामुळे सप्ताहाअखेरीस बाजारात किरकोळ वाढ झालेली दिसून आली. विप्रोचे जाहीर झालेले तिमाही निकाल आणि रिलायन्सच्या संचालक मंडळाने केलेली बोनसची घोषणा, यामुळेही बाजाराने चांगली उसळी घेतली. आयटीसीने मात्र, गटांगळी खाल्ली.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सप्ताहाच्या प्रारंभीच वाढीव पातळीवर खुला झाला. सप्ताहामध्ये त्याने ३१६२६.४४ ते ३२१३१.९२ अंशांदरम्यान आंदोलने घेतली. सप्ताहामध्ये निर्देशांकाने नवीन उच्चांकही प्रस्थापित केला. मात्र, नंतर विक्रीच्या दबाबाने तो खाली आला. सप्ताहाच्या अखेरीस निर्देशांक ३२०२८.८९ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेमध्ये तो केवळ ८.१४ अंश वाढून बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील साप्ताहिक उलाढाल मागील सप्ताहापेक्षा कमी झाली. राष्ट्रीय शेअर बाजारामध्ये मात्र उलाढाल वाढलेली दिसून आली.राष्ट्रीय शेअर बाजारात येथील निर्देशांक (निफ्टी) ०.२९ टक्के म्हणजेच २८.९ अंशांनी वाढून ९९१५.२५ अंशांवर बंद झाला. तत्पूर्वी त्याने ९९९२.०५ अंशांचा नवीन उच्चांक नोंदविला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही वाढ झाली. जीएसटी कौन्सिलने सिगारेटवरील सेसमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचा फटका आयटीसी या बड्या आस्थापनेला बसला. या आस्थापनेचे समभाग मोठ्या प्रमाणावर घसरले. परकीय वित्तसंस्थांनी बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. या संस्थांनी १९५६.५१ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले. विप्रो या आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान आस्थापनेचे तिमाही निकाल चांगले आले. त्याचप्रमाणे, रिलायन्सने केलेली बोनसची व जिओ फोनची घोषणा, यामुळे बाजारात उत्साहाचा संचार झाला. या दोन आस्थापनांच्या समभागांनीच गतसप्ताह गाजविला, असे म्हणता येईल.

एफपीआय,म्युच्युअल फंडांची मोठी गुंतवणूकभारतीय शेअर बाजारामधून सर्वाधिक फायदा मिळत असल्याने, जानेवारी ते जून २०१७ या कालावधीत परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय) आणि देशी म्युच्युअल फंडांनी भारतीय बाजारामध्ये ९७ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीशी तुलना करता, ही गुंतवणूक ३.४ टक्क््यांनी अधिक आहे.२०१७ या कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ५५ हजार ९०८ कोटी रुपयांची गुंतवणूक भारतीय बाजारामध्ये केली. याच कालावधीत भारतीय म्युच्युअल फंडांनीही ४१ हजार ७९७ कोटी रुपये गुंतविले आहेत. दोघांचे मिळून ९७ हजार ७०५ कोटी रुपये सहा महिन्यांमध्ये गुंतविले गेले आहेत. मागील वर्र्षी याच काळात २८ हजार ८११ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती.शेअर बाजाराच्या संवेदनशील आणि निफ्टी या निर्देशांकांनी वार्षिक १८ टक्के वाढ दिली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्ये तर ३० टक्के वाढ मिळाली असल्याने गुंतवणूक वाढते आहे.