मुंबई : विविध उद्योगांसह दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असलेल्या रिलायन्स समूहाने रविवारी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बहुप्रतिक्षित अशा ४ -जी सेवेचे अनावरण केल्यानंतर नववर्षात लवकरच सामान्यांसाठीही ही सेवा कार्यान्वित करण्याचे संकेत दिले आहेत. अनेक दिग्गज अभिनेते आणि सेलिब्रिटी यांच्या उपस्थितीत रविवारी रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी या सेवेचे अनावरण केले. देशात गेल्या अनेक महिन्यांपासून ४-जी तंत्रज्ञानाची चर्चा होती, तसेच रिलायन्सच्या सेवेकडे अनेकांचे डोळे लागले होते. रिलायन्स समूहाचे संस्थापक दिवंगत धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला कंपनीने या सेवेचे अनावरण केले. उपलब्ध माहितीनुसार, देशभरातील कंपनीचे सर्व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना ही सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर येत्या काही आठवड्यांत ही सेवा सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात येणार आहे. सामान्यांसाठी ही सेवा खुली केल्यानंतर पहिल्या वर्षात १० कोटी ग्राहक या सेवेचा लाभ घेतील असा अंदाज कंपनीने वर्तविला आहे. (प्रतिनिधी)
रिलायन्सची ४-जी सेवा लवकरच
By admin | Updated: December 29, 2015 01:36 IST