Join us

हिंदु राष्ट्र सेनेची मान्यता रद्द करण्यासाठी शिफारस करणार

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST


अल्पसंख्याक आयोग : मोहसिन शेखच्या खुन्यांना मोक्का लावण्याची मागणी

पुणे : संगणक अभियंता मोहसीन शेखच्या हत्येस कारणीभूत ठरलेल्या हिंदु राष्ट्र सेनेचे (एचआरएस) वर्तन घटनेविरोधी असल्याचे सांगत संघटनेची मान्यता रद्द करण्याची शिफारस करणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
शेख हत्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या समिती सदस्यांनी सोमवारी पुण्याला भेट दिली. अजेब सिंह, डॉ. टी. एन. शानू, कॅप्टन प्रवीण दावर यांचा समितीत समावेश आहे. सदस्यांनी मोहसीनच्या कुटुंबियांची भेट घेतली. खुदाई खितमदगार, भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्र प्रेमी समिती, असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हील राईट्स, मुस्लिम हक्क रक्षण संरक्षण समितीच्या सदस्यांनाही ते भेटले. गणेशोत्सव व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा टिकून राहण्यासाठी सदस्यांनी विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.
मोहसिन शेखच्या खुन्यांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई व्हावी. हा खटला जलदगती न्यायालयामार्फत (फास्ट ट्रॅक) चालविण्यात यावा. साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्यावे आदी मागण्या विविध सामाजिक संघटनांनी केल्या आहेत. (प्रतिनिधी)
-------------------
मोहसीनच्या भावाला सरकारी नोकरी द्यावी
मोहसीनचा भाऊ मुबीन यास राज्य सरकारने सरकारी नोकरीत समावून घ्यावे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्यावर निर्णय घेण्याची मागणी समितीने केली आहे.
-----------------