Join us

एकात्मिक कृषी विकासाच्या नऊ प्रकल्पांना मान्यता

By admin | Updated: May 18, 2015 03:00 IST

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सार्वजनिक व खासगी भागीदारी तत्त्वावर एकात्मिक कृषी विकासाच्या मूल्य साखळी प्रकल्पांतर्गत २०१५-१६ या वर्षासाठी

अकोला : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सार्वजनिक व खासगी भागीदारी तत्त्वावर एकात्मिक कृषी विकासाच्या मूल्य साखळी प्रकल्पांतर्गत २०१५-१६ या वर्षासाठी पहिल्या टप्प्यात नऊ प्रकल्प राबविण्यास शासनामार्फत १५ मे रोजी मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांमध्ये राज्यातील २७ जिल्हे समाविष्ट करण्यात आले आहेत.केंद्रीय कृषी मंत्रालयामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेत सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एकात्मिक कृषी विकासासाठी विविध पिकांचे उत्पादन ते विक्री व्यवस्था असलेले मूल्य साखळी विकासाचे प्रकल्प राबविण्याकरिता संरचना निहित करण्यात आली आहे. त्यामध्ये राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत आर्थिक मदत देऊन, खासगी क्षेत्रातील संस्था व कंपन्यांच्या पुढाकाराने तसेच शेतकऱ्यांच्या सहयोगातून कृषी आणि संलग्न क्षेत्रात विविध पिकांचे उत्पादन ते विक्रीची व्यवस्था असलेली मूल्य साखळीची व्यवस्था उभारण्यात येणार आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत राज्यात सार्वजनिक व खासगी भागीदारीने २०१२-१३ पासून एकात्मिक कृषी विकासाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. सन २०१५-१६ या वर्षात खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एकात्मिक कृषी विकासाच्या मूल्य साखळी प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात नऊ प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय राज्य शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत १५ मे रोजी घेण्यात आला. ६४ कोटी ५९ लाख ५ हजार रुपये किंमत असलेल्या या नऊ प्रकल्पांमध्ये राज्यातील २७ जिल्हे समाविष्ट करण्यात आले असून, या प्रकल्पांची अंमलबजावणी तातडीने करण्याच्या सूचनाही राज्याचे कृषी आयुक्त, राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि संबंधित संचालकांना या निर्णयाद्वारे शासनामार्फत देण्यात आल्या आहेत.