Join us

स्थावर मालमत्तेची गहाण मर्यादा वाढली

By admin | Updated: June 19, 2014 04:33 IST

सावकाराच्या लुबाडणुकीपासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र सावकारी सुधारणा नियमन विधेयक नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाले आहे

जितेंद्र दखने, अमरावतीसावकाराच्या लुबाडणुकीपासून शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र सावकारी सुधारणा नियमन विधेयक नुकतेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाले आहे. ज्यांच्या जमिनी सावकारांकडे मागील पंधरा वर्षांपासून गहाण पडून आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना त्या जमिनी परत मिळविण्यासाठी अर्ज करता येईल.सावकारी पाशातील गहाण शेती परत मिळविण्यासाठीची कालमर्यादा पाच वर्षे एवढी होती. ही कालमर्यादा वाढविण्याबाबतचा प्रस्ताव राज्याच्या सहकार विभागाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने सहकारमंत्र्यांनी हा प्रस्ताव अधिवेशनात मांडून त्याला अंतिम मूर्तरुप दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता मागील १५ वर्षांपूर्वीपर्यंतच्या सावकारी व्यवहारात न्याय मिळणार आहे. याकरिता विधानसभा विधेयक २०१४ क्रमांक २६ मध्ये सावकारी सुधारणा नियम क्रमांक २७ मंजूर झाला आहे. त्यामुळे त्या शेतजमिनी शेतकऱ्यांनी सावकारांकडे पाच वर्षे कर्जापोटी गहाण ठेवल्या होत्या. त्यांची आणखी दहा वर्षांची कालमर्यादा मागे वाढवून एकूण पंधरा वर्षे केली आहे. मागील १५ वर्षे सावकाराकडे स्थावर मालमत्ता शेतकऱ्यांनी गहाण ठेवून कर्ज घेतले असेल त्या मालमत्ता सावकारी पाशातून सोडविण्यासाठी आता तक्रार अर्ज करता येणार आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील सुमारे ११ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र सावकारी सुधारणा नियमन विधेयक शासनाने मंजूर केले. याबाबतच्या पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे. तालुका मंडळस्तर, शेतकरी मंडळ, तलाठी यांच्यामार्फत त्यांना माहिती दिली जाईल. टोल फ्री क्रमांक देऊन सर्व माहिती २४ तास उपलब्ध राहील.