Join us  

मालमत्ता विकण्याचा आरकॉमचा निर्णय अत्युत्तम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 3:41 AM

नवी दिल्ली : रिलायन्स कम्युनिकेशन्सने (आरकॉम) आपल्या वायरलेस टेलिकॉम मालमत्ता रिलायन्स जिओला विकण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दुस-याच दिवशी स्टेट बँक आॅफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांनी या निर्णयाची प्रशंसा केली आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स कम्युनिकेशन्सने (आरकॉम) आपल्या वायरलेस टेलिकॉम मालमत्ता रिलायन्स जिओला विकण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दुस-याच दिवशी स्टेट बँक आॅफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार यांनी या निर्णयाची प्रशंसा केली आहे. हा निर्णय अत्युत्तम असून, अन्य प्रवर्तकांना उदाहरण घालून देणारा आहे, असे कुमार यांनी म्हटले आहे.रजनीश कुमार यांनी एका बिझनेस वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ही अत्यंत चांगली आणि स्वागतार्ह घटना आहे. आरकॉमला कर्ज देणाºया बँकांना या निर्णयाने पूर्ण संरक्षण मिळाले असून, कोणताही तोटा अपेक्षित नाही. दूरसंचार क्षेत्रात तणाव असतानाही हा निर्णय घेतला गेला आहे, ही बाब महत्त्वाची आहे. तणावाखाली असलेल्या अन्य कंपन्यांच्या प्रवर्तकांसमोर आरकॉमने उत्तम उदाहरण घालून दिले आहे.रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी असलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमने गुरुवारी आरकॉमसोबत ठोस करार केल्याची घोषणा केली होती. या करारानुसार आरकॉम आणि तिच्या सहायक कंपन्यांच्या वायरलेस मालमत्ता जिओने खरेदी केल्या आहेत. आरकॉमच्या दूरसंचार टॉवर, आॅप्टिक फायबर केबल नेटवर्क, स्पेक्ट्रम आणि मीडिया कन्व्हर्जन्स नोड्स या चार वर्गांतील मालमत्ता जिओच्या ताब्यात येतील. आरकॉमकडून विकण्यात येत असलेल्या या मालमत्तांत १२२.४ मेगाहर्ट्झचे ४-जी स्पेक्ट्रम, ८००, ९००, १८०० आणि २१०० मेगाहर्ट्झचे बँड्स, ४३ हजार टॉवर्स, देशभरात पसरलेली १.७८ लाख कि.मी. फायबर केबल आणि पाच दशलक्ष वर्गफूट क्षेत्राचे २४८ मीडिया कन्व्हर्जन्स नोड्स यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)