Join us  

CoronaVirus News : नोटांमधूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार, आरबीआयची माहिती

By ravalnath.patil | Published: October 05, 2020 2:27 PM

Reserve Bank of India : लोकांनी नोटांऐवजी अधिकाधिक डिजिटल पेमेंट्स वापरायला हवेत, असे आरबीआयने म्हटले आहे.

ठळक मुद्देअर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्र लिहून चलनातील नोटा जीवाणू आणि विषाणूंच्या वाहक आहेत काय? असा सवाल केला होता.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग नोटांद्वारे होत नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. चलनातील नोटांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे जीवाणू किंवा विषाणू पसरतात. त्यामुळे नोटांचा वापर करण्याऐवजी डिजिटल पेमेंटचा वापर करायला हवे, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स म्हणजेच सीएआयटीद्वारे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरबीआयने एका मेलमध्ये अप्रत्यक्षरित्या यासंदर्भात सांगितले आहे. लोकांनी नोटांऐवजी अधिकाधिक डिजिटल पेमेंट्स वापरायला हवेत, असे आरबीआयने म्हटले आहे.

वृत्तानुसार, यापूर्वी ९ मार्चला सीएआयटीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्र लिहून चलनातील नोटा जीवाणू आणि विषाणूंच्या वाहक आहेत काय? असा सवाल केला होता. मंत्रालयाकडून हे पत्र आरबीआयला पाठविण्यात आल्याचे सीएआयटीने म्हटले आहे. आरबीआयने नोटा हे कोरोनासह जीवाणू आणि विषाणूंचे वाहक असू शकतात अशी सूचना सीएआयटीला दिली आहे. त्यामुळे यापासून संसर्ग टाळण्यासाठी डिजिटल पेमेंटचा अधिकाधिक वापर केला पाहिजे, असे सीएआयटीने म्हटले आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी, लोक मोबाइल आणि इंटरनेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्ड इत्यादी विविध ऑनलाइन डिजिटल चॅनेलद्वारे घरी बसून पैशांची देवाण घेवाण करू शकतात. यामुळे नोटांचा वापर करणे किंवा एटीएममधून पैसे काढणे टाळता येऊ शकते. या व्यतिरिक्त कोरोनावर वेळोवेळी जाहीर केलेल्या सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे, असे ३ ऑक्टोबर २०२० रोजी सीआयआयटीला पाठविलेल्या उत्तरात आरबीआयने म्हटले आहे.

दरम्यान, आरबीआयने लोकांनी जास्तीत जास्त डिजिटल पेमेंटचा वापर करण्याचे आवाहन केले आहे, असे सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले. तसेच,  डिजिटल पेमेंट व्यवहारासाठी आकारण्यात आलेला बँक शुल्क माफ करावे आणि सरकारने बँकांच्या शुल्काविरूद्ध बँकांना थेट अनुदान द्यावे. ही अनुदान सरकारवर आर्थिक भार टाकणार नाही, तर ते नोटांच्या छपाईवर असेल. यामुळे खर्च कमी करेल, असे निवेदनात म्हटले आहे.  

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँककोरोना वायरस बातम्या