Join us  

काळ्या पैशांतून २५८ किलो सोने खरेदी, सराफ व्यावसायिकाला ईडीने ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 5:16 AM

नोटाबंदीच्या काळात काळ्या पैशांतून २५८ किलो सोन्याची खरेदी केल्याप्रकरणी सराफ व्यावसायिकाला ईडीने शुक्रवारी बेड्या ठोकल्या. ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : नोटाबंदीच्या काळात काळ्या पैशांतून २५८ किलो सोन्याची खरेदी केल्याप्रकरणी सराफ व्यावसायिकाला ईडीने शुक्रवारी बेड्या ठोकल्या. ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.कोट्यवधी रुपयांची फेरफार करून ते पैसे सोने खरेदीसाठी वापरणा-या मेसर्स पुष्पक बुलियर्स प्रा.लि.चा मालक व सराफ व्यावसायिक चंद्रकांत नरसीदास पटेल याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी अटक केली. त्याने काळ्या पैशांतून २५८ किलो सोने खरेदी केल्याचा संशय ईडीला आहे. त्यानुसार शुक्रवारी पटेलच्या मुंबईतील कार्यालयावर ईडीने छापे टाकले.ईडीने दिलेल्या माहितीनुसार, भुलेश्वर रोड येथील ठक्कर निवास परिसरात पटेल याची कंपनी आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील ४१ दिवसांत ८४ कोटी ५० लाख एवढी मोठी रक्कम पटेल याने त्याच्या मे. पिहू गोल्ड आणि मे. सतनाम या कंपन्यांच्या खात्यावर जमा केली होती. त्यानंतर अचानक ही रक्कम या खात्यातून काढण्यात आली. त्यानंतर हे पैसे पुष्पक बुलियर्सच्या खात्यात जमा करण्यात आले. याच पैशांतून तब्बल २५८ किलो सोन्याची खरेदी करण्यात आली. मात्र पुष्पक बुलियर्सचे बँक खाते एनपीए (नॉन परफॉर्मिंग अकाउंट) म्हणून जाहीर करण्यात आले. बँक खाते एनपीए म्हणून जाहीर झाल्यानंतर पटेलने एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्याचे ईडीच्या तपासातून समोर आले. त्याच्या कार्यालयातून या संदर्भातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत.या प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.