Join us

खरीप पिकांचे उत्पादन घटणार

By admin | Updated: July 19, 2014 00:10 IST

खरीप पिकांचे उत्पादन २०१४-१५ या वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप कमी असेल, अशी माहिती सरकारने शुक्रवारी संसदेत दिली.

नवी दिल्ली : खरीप पिकांचे उत्पादन २०१४-१५ या वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप कमी असेल, अशी माहिती सरकारने शुक्रवारी संसदेत दिली.२०१३-१४ या वर्षाच्या पीक हंगामात (जुलै ते जून) २६.४३८ कोटी टन एवढे विक्रमी धान्य उत्पादन झाले. त्यातील १२.९३७ टन धान्य खरीप हंगामातील होते. देशातील पेरणी आणि पावसाचे चित्र पाहता २०१४-१५ या वर्षात पिकांचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी असेल, असे कृषी राज्यमंत्री संजीवकुमार बालयान यांनी एका लेखी उत्तरात सांगितले. दरवर्षी सप्टेंबरमध्ये धान्य उत्पादनाचा पहिला अंदाजित आराखडा तयार केला जातो, यावर्षी तो अद्याप तयार व्हायचा आहे. देशभरातील कमी पावसाचा परिणाम पीक उत्पादनावर होणार आहे. २३ राज्यांमधील ५२० जिल्ह्यांमध्ये पावसाच्या टंचाईचा मुकाबला करण्यासाठी सरकारने कृषी आकस्मिक योजना तयार केली आहे. त्यासाठी कोरडवाहू कृषी केंद्रीय संशोधन संस्थेने (सीआरआयडीए) जिल्हानिहाय आकस्मिक योजनेची मदत घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अर्धा जुलै संपून गेल्यानंतरही अनेक राज्यांत पेरण्या खोळंबल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)