Join us

पोस्ट गावगिरी सावर्डे

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST

कुडचडेला सावर्डे का म्हणतात?

कुडचडेला सावर्डे का म्हणतात?
सावर्डे व कुडचडे ही जोडशहरे आहेत; परंतु कुडचडे बाजाराला सावर्डे नावानेच ओळखले जाते. मात्र, सावर्डे हे सांगे तालुक्यात व कुडचडे येते केपे तालुक्यात. या भागाची जीवनदायिनी असलेली गोव्यातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळखली जाणारी जुवारी नदी सावर्डे व कुडचडे गावांना वेगळे करते. जुवारी नदीचा उगम तसा पाहता सांगे तालुक्यातूनच झालेला आहे. ती कुडचडे-शिरोडामार्गे कुठ्ठाळीहून समुद्राला मिळते. कुडचडे पोतरुगीजकालीन रेल्वे स्थानक आहे. त्याला सावर्डे रेल्वे स्थानक म्हणून ओळखतात. कुडचडेत कदंब बसस्थानकातून कुडचडेचा प्रवास करताना तिकीट सावर्डेचे काढले जाते. कुठे जातो, असे विचारताच प्रवासी ताडकन सावर्डे असे उत्तर देतो.
याचे एक पोतरुगीजकालीन सत्य आहे. गोव्यात रेल्वे लाईन आणण्याचा विचार पोतरुगीज सरकारने चालविला होता. त्या काळी जागेचे सर्वेक्षण सुरू होते. रानावनातून हा रेल्वेमार्ग जाणार होता. त्या वेळी कुडचड्यातही लोकवस्ती, जमीन भरपूर. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी रेल्वेमार्गासाठी जमीन पाहिली. रेल्वेमार्ग कसा काढावा हेही मुक्रर झाले. वास्कोपर्यंत रेल्वेमार्ग जाणार होता. लोंढय़ाहून कॅसलरॉकमार्गे कुळे, कालेहून कुडचडे, मडगाव, वास्को अशी रेल्वेची आखणी केली. सावडर्य़ात एक रेल्वे स्थानक उभारण्याची अधिकार्‍यांची तयारी होती. मात्र, जागा हवी होती. सर्व जागा सावर्डेकर कुटुंबीयांची होती. रेल्वे अधिकार्‍यांनी त्यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता, सावर्डे येथील रहिवासी असलेल्या सावर्डेकर कुटुंबीयांनी त्यांना जागा देण्याचे मान्य करून रेल्वे स्थानक सावर्डे भागातच व्हावे, अशी अट घातली व त्यांना धडे-सावर्डे येथे जमीन देण्यास राजी झाले. रेल्वे स्थानकाचे ‘सावर्डे रेल्वे स्थानक’ असे नामकरण करावे, अशीही अट घातली. जागा मोफत देण्याचे मान्य केले. मात्र, धडे-सावर्डे येथे जुवारी नदी व त्या ठिकाणी डोंगर भाग त्याचा विकास करण्यास जादा खर्च होणार हे लक्षात आणून रेल्वेने सावर्डेकरांकडे कुडचडे येथे त्यांचीच सपाट असलेली जागा मागितली. सावर्डेकर कुटुंबीयांनी त्यांचा प्रस्ताव मान्य करताना रेल्वे स्थानकाला ‘सावर्डे रेल्वे स्थानक’ असे नाव देण्याची अट घातली. रेल्वेनेही ती अट मान्य केली व सावर्डे रेल्वे स्थानक झाले. या सावर्डे रेल्वे स्थानकावरून कुडचडेला ‘सावर्डे’ हे नाव रूढ झाले. तेच आज सर्वत्र परिचित आहे.
कुडचडे बाजार हा कुडचडे-काकोडा नगरपालिका क्षेत्रात आहे; परंतु इतर भागातून येणारे लोक या बाजाराला ‘सावर्डे बाजार’ म्हणून ओळखतात.
‘नावात काय आहे’ असे म्हटले जाते. मात्र, नावात खूप काही आहे. सावर्डेकर कुटुंबीयांनी आपली जमीन रेल्वेला दिली व आपले ‘सावर्डे’करांचे नाव सर्वदूर केले. आहे ना नावात काही तरी?
- आनंद मंगेश नाईक