Join us  

‘फेड’ची दरवाढ टळण्याच्या शक्यतेने सेन्सेक्स उसळला!

By admin | Published: October 06, 2015 4:25 AM

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची संभाव्य व्याज दरवाढ तूर्तास टळणार असल्याची शक्यता बळावल्यामुळे भारतीय शेअर बाजारांत सोमवारी उत्साह संचारला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स

मुंबई : अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची संभाव्य व्याज दरवाढ तूर्तास टळणार असल्याची शक्यता बळावल्यामुळे भारतीय शेअर बाजारांत सोमवारी उत्साह संचारला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५६४.६0 अंकांनी वाढून २६,७८५.५५ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सने सलग चौथ्या सत्रात वाढ नोंदविली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याचा लाभही बाजारास मिळाला. दुसरीकडे आशियाई बाजारही वाढीने बंद झाले. युरोपीय बाजारात सकाळी तेजीचे वातावरण पाहायला मिळाले. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, अमेरिकी रोजगार क्षेत्राचा अहवाल अपेक्षेपेक्षा अधिक कमजोर आकडे दर्शवीत आहे. याचाच अर्थ फेडरल रिझर्व्ह आताच व्याजदर वाढवू शकणार नाही. जगभरातील बाजारांना याचा लाभ झाला आहे. ३0 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स दिवसभर तेजी दर्शवीत होता. एका क्षणी तो २६,८२२.४२ अंकांवर गेला होता. सत्राच्या अखेरीस ५६४.६0 अंकांची अथवा २.१५ टक्क्यांची वाढ नोंदवून तो २६,७८५.५५ अंकांवर बंद झाला. २१ आॅगस्ट रोजी सेन्सेक्स या पातळीवर होता. गेल्या चार सत्रात सेन्सेक्सने १,१६८.७१ अंकांची वाढ मिळविली आहे. २९ सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 0.५0 टक्क्याची कपात केल्यापासून बाजार सातत्याने वाढत आहे. व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,१00 अंकांच्या पातळीच्या वर चढला आहे. १६८.४0 अंकांची अथवा २.१२ टक्क्यांची वाढ नोंदवून निफ्टी ८,११९.३0 अंकांवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांनी १५ जानेवारीनंतरची सर्वाधिक एक दिवसीय वाढ नोंदविली आहे.मुंबई शेअर बाजारांतील क्षेत्रीय निर्देशांकापैकी भांडवली वस्तू क्षेत्राचा निर्देशांक सर्वाधिक ३.२८ टक्क्यांनी वाढला. त्याखालोखाल इन्फा, बँकेक्स आणि मेटल निर्देशांक वाढले. व्यापक बाजारांतही तेजी दिसून आली. मीडकॅप आणि स्मॉलकॅप अनुक्रमे १.७९ टक्के आणि १.६२ टक्के वाढले. आशियाई बाजारांपैकी चीन, टोकियो, हाँगकाँग आणि दक्षिण कोरिया येथील शेअर बाजार 0.७६ टक्के ते १.६२ टक्के वाढले. युरोपीय बाजारांत सकाळच्या सत्रात २.१२ टक्के ते ३.१३ टक्के वाढ दिसून येत होती. (वृत्तसंस्था)