Join us

पोलिसांचा गणपती

By admin | Updated: August 31, 2014 22:51 IST

पोलीस आयुक्तालयातील २९ वर्षांची परंपरा

पोलीस आयुक्तालयातील २९ वर्षांची परंपरा
औरंगाबाद : पोलीस आयुक्तालय पाहिल्यावर भल्याभल्यांना घाम फुटतो. कारण या ठिकाणी कडक शिस्तीचे वातावरण असते. शहरातील कायदा, सुव्यवस्था राखणार्‍या पोलिसांची येथे सतत वर्दळ असते. कधी, कुठे काय घडेल याचा नेम नसल्याने सदैव येथील पोलीस अधिकार्‍यांना सतर्क राहावे लागते. मात्र, सध्या या परिसरात गणपतीची आरती, घंटीचा निनाद सर्वांच्या कानावर पडत आहे. अख्खे शहरच गणपतीमय झाले आहे. त्यातून पोलीस आयुक्तालय कसे वेगळे राहू शकते? खाकी वर्दीतही माणूस दडलेला असतो, त्याचीही देवावर श्रद्धा असते. या भावनेतूनच येथे २९ वर्षांपासून गणपतीची स्थापना केली जात आहे. वेळात वेळ काढून सर्व पोलीस बांधव सकाळी व संध्याकाळी आरतीच्या वेळी येथे एकत्र भेटतात, हेच या गणेशोत्सवाचे फलित होय.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासारखे सार्वजनिक कार्यक्रम व सणांमध्ये कामाची खरी कसरत असते ती पोलिसांची. सार्वजनिक ठिकाणी कोठेही विपरीत घटना घडू नये म्हणून ते आपल्या डोळ्यांमध्ये तेल घालून शहरवासीयांची रक्षा करीत असतात. त्यांना ना कुठला सण असतो, ना कुठला वार. समाजाचे रक्षण हे त्यांचे पहिले कर्तव्य असते. पोलीस विविध ठिकाणी ड्यूटीवर असतात. महिनोन्महिने एकमेकांच्या भेटी होत नाहीत. मात्र, गणेश मंडळ स्थापन केले तर आरती, भजन, भंडारा, विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने सर्व जण एकत्र येतील, या भावनेतून १९८५ च्या गणेशोत्सवात पहिल्यांदा पोलीस आयुक्तालयात गणपतीची स्थापना करण्यात आली होती. हजेरी मेजर ज्ञानोबा मुंडे, कल्याणसिंग ठाकूर, रवींद्र भावसार, अशोक गाडे, किशन सूर्यवंशी यांनी त्यावेळी वीर शिवाजी गणेश मंडळाची स्थापना केली. त्यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या मैदानाच्या बाजूला जुन्या लिंबाच्या झाडाखालील ओट्यावर गणेशमूर्ती बसविण्यात आली होती. मागील काही वर्षांपासून ११० फूट लांब व १७ फूट रुंद ओट्यावर गणेशाची मूर्ती बसविण्यात येते. येथे एकाच ठिकाणी एक मोठी मूर्ती व एक लहान मूर्ती बसविण्यात आली आहे. मोठ्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते व लहान मूर्ती वर्षभर एका हॉलमध्ये ठेवण्यात येते. त्या मूर्तीचे पुढील वर्षी विसर्जन केले जाते. ज्ञानोबा मुंडे यांनी सांगितले की, मागील तीन वर्षांपासून आम्ही वर्गणी मागणे बंद केले आहे व गणपतीसमोर दानपेटी ठेवली आहे.
(जोड)