नवी दिल्ली :हॉटेल, कार्यक्रम आयोजक आणि इतर संस्थांकडून ग्राहकांच्या आधार कार्डांच्या फोटोकॉपी घेऊन ती कागदावर साठवण्याची प्रथा थांबवण्यासाठी ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा’कडून लवकरच नवा नियम आणला जाणार आहे. कागदाधारित आधार पडताळणीची पद्धत आधार कायद्याचे उल्लंघन करणारी असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या काही दिवसांत आधारबाबत अनेक निर्णय घेतले आहेत.
नोंदणी बंधनकारक
‘यूआयडीएआय’चे सीईओ भुवनेश कुमार यांनी सांगितले की, आधार-आधारित पडताळणी करण्यासाठी सर्व संस्थांना नोंदणी बंधनकारक करण्यात येईल.
नोंदणीकृत संस्थाच आधारद्वारे पडताळणी करू शकतील. नोंदणी झालेल्या संस्थांना नवी तंत्रज्ञान सुविधा दिली जाईल. हा नियम लवकरच अधिसूचित केला जाणार आहे.
गोपनीयता सुरक्षित राहील, धोका कमी होईल
कुमार यांनी सांगितले की, ऑफलाइन पडताळणी करणाऱ्या संस्थांना ‘ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस’ (एपीआय) देण्यात येणार आहे.
यूआयडीएआय एका नव्या ॲपचीही चाचणी करत आहे, जे थेट ॲप-टू-ॲप पडताळणी करण्यास मदत करेल. हे ॲप विमानतळ किंवा वयोमर्यादा असलेली उत्पादने विकणाऱ्या दुकानांमध्येही वापरता येईल.
या पद्धतीमुळे आधार-आधारित पडताळणी कागदविरहित होईल, गोपनीयता सुरक्षित राहील आणि माहिती गळतीचा धोका कमी होईल.
