Join us  

Petrol Diesel Price पेट्रोल-डिझेलचा भडका; मुंबईतील दर ९१ रुपयांवर, गेल्या दोन वर्षातील उच्चांक

By देवेश फडके | Published: January 13, 2021 11:50 AM

पेट्रोल आणि डिझेल २५ पैशांनी महागले असून, या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर ९१.०७ रुपये तर, डिझेलचा दर ८१.३४ रुपये झाला आहे.

ठळक मुद्देपेट्रोल डिझेलच्या दरवाढीने गेल्या दोन वर्षातील उच्चांकपेट्रोल आणि डिझेल २५ पैशांनी महागले मुंबईत पेट्रोलचा दर ९१.०७ रुपये तर, डिझेलचा दर ८१.३४ रुपये

मुंबई :पेट्रोलियम कंपन्यांकडून देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील तेजी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होत असलेले अवमूल्यन याचा पेट्रोलियम कंपन्यांवर दबाव वाढल्याने आज (बुधवारी) इंधन दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल २५ पैशांनी महागले आहे. या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर ९१ रुपयांवर गेले आहे. 

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने गेल्या दोन वर्षातील उच्चांक गाठला असून, मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये पेट्रोलचे दर नव्वद रुपयांवर गेले आहेत. मुंबईत पेट्रोल ऐतिहासिक पातळीच्या दिशेने पुढे सरकरत आहे. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा दर ९१.०७ रुपये तर, डिझेलचा दर ८१.३४ रुपये झाला आहे. यापूर्वी ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पेट्रोलने ९१.३४ रुपयांचा सार्वकालीन उच्चांकी स्तर गाठला होता.  

दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८४.४५ रुपये तर डिझेलचा दर प्रतिलिटर ७४.६३ रुपये झाला आहे. चेन्नईत पेट्रोल दर ८७.१८ रुपये असून, डिझेल ७९.९५ रुपये आहे. कोलकात्यात प्रतिलिटर पेट्रोलचा दर ८५.९२ रुपये असून, डिझेल ७८.२२ रुपये आहे. बेंगळुरूमध्ये एक लीटर पेट्रोलचा दर ८७.३४ रुपये असून, डिझेलचा भाव ७८.९८ रुपये आहे. 

दरम्यान, देशात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या आठवड्यात कंपन्यांनी दोन दिवस इंधन दरवाढ केली होती. त्यानंतर सलग पाच दिवस इंधन दर स्थिर होते. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचा भाव ०.२९ डॉलरने वधारला आणि ५३.५० डॉलर झाला. गेल्या १० महिन्यात पेट्रोल  १४ रुपये, तर डिझेल १२ रुपयांनी महागले आहे. धीम्या गतीने होत असलेली इंधन दरवाढ ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहे, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :पेट्रोलडिझेलखनिज तेल