Join us  

प्राप्तिकर विवरणात मूळ अटी कायमच

By admin | Published: June 02, 2015 12:12 AM

प्राप्तिकर विवरणाच्या नव्या फॉर्म्समध्ये परदेशी प्रवास तसेच बँक खात्याचा तपशील देण्याची गरज नाही, असे छातीठोकपणे सांगत केंद्रीय वित्तमंत्रालयाने

मनोज गडनीस ल्ल मुंबईप्राप्तिकर विवरणाच्या नव्या फॉर्म्समध्ये परदेशी प्रवास तसेच बँक खात्याचा तपशील देण्याची गरज नाही, असे छातीठोकपणे सांगत केंद्रीय वित्तमंत्रालयाने विवरणाचे नवे फॉर्म्स जारी केले असले तरी, नव्या फॉर्म्समध्येही हे तपशील द्यावेच लागणार आहेत. किंबहुना आधीच्या तुलनेत नव्या फॉर्म्सच्या माध्यमातून काकणभर अधिक माहिती सरकारला मिळणार आहे.करदात्याच्या परदेशी प्रवासाचा तपशील आणि सर्व बँक खात्याची माहिती या दोन मुद्यांवरून गदारोळ झाल्यानंतर या मुद्यांना वगळल्याचा दावा सरकारने केला असला तरी, नव्या फॉर्ममध्ये करदात्याला त्याचा पासपोर्ट क्रमांक द्यावा लागणार आहे. तसेच, ज्या बँक खात्यातून त्याचे सर्व व्यवहार होतात, त्या बँकेचे नाव, शाखेचे नाव आणि आयएफएससी कोडही द्यावा लागणार आहे.या दोन्ही मुद्यांचा अंतर्भाव केल्यामुळे या अगोदर असलेल्या प्रस्तावित तरतुदींपेक्षा जास्त माहिती सरकारच्या हाती लागणार आहे. आधीच्या प्रस्तावीत नियमानुसार, करदात्याला एका आर्थिक वर्षातील त्याच्या परदेशी प्रवासाची माहिती देणे बंधनकारक होते. परंतु, आता थेट पासपोर्ट क्रमांकच द्यावा लागणार असल्याने विभागाला संबंधित करदात्याने आजवर केलेला सर्व परदेशातील प्रवास आणि परकीय विनिमयाचे व्यवहार याची माहिती विनासायास मिळणार आहे. त्यामुळे नवीन आयकर फॉर्म धूळफेकच ठरला आहे.