Join us  

हुशार असाल तरच अमेरिकेत यापुढे प्रवेश मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 12:49 AM

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या ‘स्टेट आॅफ द युनियन’ भाषणात गुणवत्तेवर आधारित इमिग्रेशन व्यवस्थेवर भर दिला. कुशल लोकांनाच प्रवेश दिला जाण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या धोरणाचा भारतासारख्या देशाला लाभच होईल, असे जाणकारांना वाटते.

वॉशिंग्टन - अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या ‘स्टेट आॅफ द युनियन’ भाषणात गुणवत्तेवर आधारित इमिग्रेशन व्यवस्थेवर भर दिला. कुशल लोकांनाच प्रवेश दिला जाण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. या धोरणाचा भारतासारख्या देशाला लाभच होईल, असे जाणकारांना वाटते.अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त सत्रात राष्ट्राध्यक्ष वार्षिक भाषण करतात, त्याला ‘स्टेट आॅफ द युनियन’ भाषण म्हटले जाते. या भाषणात राष्ट्राध्यक्ष देशातील स्थितीची माहिती सभागृहास देतात. ८0 मिनिटांच्या आपल्या भाषणात ट्रम्प यांनी चार स्तंभी इमिग्रेशन धोरण प्रस्तावित केले. ड्रीमर्स या नावाने ओळखल्या जाणा-या तसेच पालकांनी अमेरिकेत आणलेल्या १.८ दशलक्ष लोकांच्या नागरिकत्वाच्या प्रश्नावर तोडगा काढणे, सीमा सुरक्षा, व्हिसाची लॉटरी पद्धत रद्द करणे आणि कौटुंबिक इमिग्रेशन मर्यादित करणे या चार बाबींचा त्यात समावेश आहे. ट्रम्प म्हणाले की, कौटुंबिक साखळीद्वारे अमेरिकेत येणा-यांची संख्या कमी करण्याची योजना आहे. या प्रस्तावास रिपब्लिकन्स व डेमोक्रॅट्सनी पाठिंबा द्यायला हवा. आमच्या योजनेनुसार, जे ड्रीमर्स शिक्षणाची व कामासाठी आवश्यक पात्रता पूर्ण करतील, त्यांनाच अमेरिकेचे नागरिकत्व मिळेल.मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याची योजना आहे, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, सीमेवरून गुन्हेगार आणि अतिरेकी आमच्या देशात प्रवेश करतात. अटक आणि सुटका हे चक्र त्यातून सुरू होते. ते आम्हाला संपवायचे आहे. लॉटरीमुळे गुणवत्तेशिवाय विदेशींना अमेरिकेत प्रवेश मिळणे बंद होईल. अमेरिकेत प्रत्येक देशाला कोटा आहे. कोणत्याही देशाला ७ टक्क्यांपेक्षा जास्तव्हिसा मिळत नाही. ही पद्धत रद्द झाल्यास भारतीयांना लाभ होईल. पाच वर्षांत ५0 हजारांपेक्षा जास्त स्थलांतरितांना अमेरिकेत पाठविणारे १८ देश सध्या डायव्हर्सिटी व्हिसासाठी पात्रच नाही. त्यात भारताचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)वैवाहिक जोडीदार व मुलांनाच परवानगीसध्या अमेरिकेत स्थायिक झालेला विदेशी नागरिक आपल्या अमर्याद नातेवाइकांना अमेरिकेत आणू शकतो. त्याचा फायदा घेऊन दूरचे नातेवाईकही अमेरिकेत आणले जातात. केवळ वैवाहिक जोडीदार आणि मुले यांनाच अमेरिकेत येण्याची परवानगी असावी, अशी आपली भूमिका असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पअमेरिका