Join us  

‘आयकर’ने अदा केला एक लाख कोटींचा रिफंड

By admin | Published: February 09, 2016 1:51 AM

आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत तब्बल १ लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे. केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी ट्विटवर ही माहिती दिली.

नवी दिल्ली : आयकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत तब्बल १ लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी केला आहे. केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी ट्विटवर ही माहिती दिली.अधिया यांनी म्हटले की, २0१५-१६ या आर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत १.७५ कोटी करदात्यांना १ लाख कोटी रुपयांचा रिफंड जारी करण्यात आला आहे. करदात्यांना रिफंड लवकरात लवकर मिळावा यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) गेल्या वर्षी अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या होत्या. ५0 हजार रुपयांपेक्षा कमी रकमेचे रिफंड लवकरात लवकर अदा करण्यात यावे, असे त्यांना बजावण्यात आले होते. फिल्ड अधिकाऱ्यांना ५ हजार रुपयांपर्यंत रिफंड तात्काळ देण्याचे निर्देश सीबीडीटीने दिले होते. ५ हजारांपेक्षा कमी रकमेच्या कराची थकबाकी असलेल्या प्रकरणांत येणे असलेला कर रिफंडमधून परस्पर कापून न घेता रिफंड करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. (वृत्तसंस्था)