Join us  

भाव घसरल्याने तेल कंपन्या हवालदिल

By admin | Published: December 30, 2014 11:29 PM

डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घटल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांचे नुकसान १० हजार कोटी रुपयांपर्यंत गेले आहे.

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घटल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांचे नुकसान १० हजार कोटी रुपयांपर्यंत गेले आहे. डिझेल व पेट्रोलच्या किमतीचा आढावा घ्यायच्या आधी कंपन्यांवर दबाब वाढला आहे.इंडियन आॅईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ३१ डिसेंबर रोजी किमतीचा आढावा घेणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट होताच देशातील तेलाच्या किरकोळ किमतीही कमी व्हायला हव्यात अशी आग्रही मागणी आहे; परंतु तेल कंपन्यांचे म्हणणे असे आहे की, देशात पेट्रोल व डिझेलच्या किमती निश्चित केल्या जातात त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल व डिझेलच्या किमतींच्या आधारावर, न की आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या वाढणाऱ्या किंवा घटणाऱ्या किमतीवर. शिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत जशी ठरते त्याचाही परिणाम पेट्रोल व डिझेलच्या भावावर होतो.यापूर्वी १६ डिसेंबर रोजी पेट्रोल व डिझेलच्या किमतीचा आढावा घेण्यात आला होता व आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत खूप खाली आली आहे. कंपन्या कच्चे तेल ज्या भावात विकत घेतात व त्याच्यावर प्रक्रिया करून बाजारात ते पाठविले जाते तेव्हा त्याचा भाव जो असायला हवा तो नसतो, त्यामुळेही आमचे नुकसान होते, असे कंपन्यांचे म्हणणे आहे. वरील तीन कंपन्यांना एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत साठवून ठेवलेल्या इंधनावर ५,३०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)