Join us

दहावी झाली आता काय

By admin | Updated: June 20, 2014 21:25 IST

योग्य पर्यायांची निवड करणे गरजेचे

योग्य पर्यायांची निवड करणे गरजेचे
करिअरचा करा मास्टर प्लान
औरंगाबाद, दि. २० : दहावीनंतर पुढे काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही सतावू लागतो. कोणी आपल्या आवडीचे करिअर निवडतात, तर कोणी चरितार्थासाठी कमाई करण्यासाठी आपल्या आवडी- निवडींना बाजूला सारून कामाला जातात. कोणते तरी काम मिळवणे आणि ते करणे याला करिअर म्हटले जात नाही. त्यापेक्षा अधिक काही करण्याची मनीषा असेल, काही उपजत गुण, आवडी- निवडी, सर्जनशीलता अंगी असेल, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात आपली मोहोर उठवण्याची ओढ असेल, तर त्या दृष्टीने केलेले प्रयत्न हे करिअरचे आहेत. करिअरची निवड करताना जे क्षेत्र निवडू त्यासाठी जे परिश्रम घेऊ त्यातून पैसा आणि समाधान या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळतील याची किमान खात्री तरी असावी लागते.
दहावीपूर्वीच हवी तयारी
योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे हेही तितकेच महत्त्वाचे असते. त्याचा विचार करून पालकांनी आपल्या पाल्यांच्या भवितव्याचा विचार प्राथमिक स्तरावरूनच करावा. काही प्रदेशांमध्ये पालक त्यांच्या पाल्यांना इयत्ता नववी मध्येच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी सुरू करतात. त्यामुळे ती मुले बहुसंख्येने कें द्रीय सेवेत असतात. व्यावसायिक समाज उदा. गुजराती- मारवाडी आपल्या मुलांना लहानपणापासूनच व्यवहाराचे धडे देतात, जेणेकरून ती मुले पहिल्या पिढीच्या व्यवसायात भर घालत तो भरभराटीला आणतात. यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी खालील बाबी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. करिअरची निवड करताना एखाद्या क्षेत्रात दिसणारा पैसा, प्रसिद्धी किंवा आराम, अशा वरवरच्या गोष्टींमुळे त्या क्षेत्राची निवड केली असल्यास ते अल्पजीवी ठरेल किंवा त्यातून मिळणारा संतोषही अल्प ठरेल.