Join us  

आता जीएसटीची खरी मॅच सुरू, खरेदीचे मॅचिंग करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 1:04 AM

प्रत्येक करदात्याला या माहितीची पुस्तकाशी जुळवणी करावी लागेल.

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सरकारने १८ मेपासून जीएसटीआर-२ए पाहण्यास सुरुवात केली आहे. काय आहे हा प्रकार? करदात्यांनी आता काय करायला हवं?कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, १ जुलै २0१७पासून जीएसटी लागू झाला. आर्थिक वर्ष २0१७-१८ हे या मार्चमध्ये संपलं. आता प्रत्येक करदात्याला त्याच्या लेखापुस्तकांमध्ये खरेदी-विक्री व जीएसटीच्या खात्यांची जुळवणी करून त्यानुसार रिटर्न्स दाखल करावे लागतील. जीएसटीआर-२ए मध्ये प्रत्येक करदात्याची बिलानुसार खरेदीची माहिती परावर्तित होईल. प्रत्येक करदात्याला या माहितीची पुस्तकाशी जुळवणी करावी लागेल. आता जीएसटीची खरी मॅच सुरू होईल, कारण विक्री व खरेदी जुळली तरच जीएसटीत आपण जिंकलो, असं समजावं.अर्जुन : कृष्णा, जीएसटीआर-२एमध्ये कोणकोणत्या गोष्टी परावर्तित होतात?कृष्ण : अर्जुना, जीएसटीआर-२एमध्ये बी२बी इन्व्हॉइसेस, डेबिट नोट, क्रेडिट नोट, कंपोझिशन करदात्यांकडून खरेदी केलेल्याचे बिल, टीडीएस, टीसीएसचे घेतलेले क्रेडिट आणि विक्रेत्याने या बिलामध्ये काही सुधारणा केली असेल, तर सुधारित बिल हे सारे परावर्तित होईल.अर्जुन : करदात्याने २ए आवर्जून तपासणे का गरजेचे आहे?कृष्ण : काही दिवसांतच सरकार जीएसटीआर-२ए चालू करेल. जीएसटीआर-२मध्ये आपल्याला हिशोबाच्या पुस्तकांप्रमाणे क्रेडिट मिळेल. जर विक्रेत्याने त्याच्या जीएसटीआर १मध्ये करदात्याच्या खरेदीची माहिती टाकली नसेल तर त्याला बिलाचे क्रेडिट मिळणार नाही. त्यामुळे जीएसटीआर-२ मधील माहिती तपासून इनपुट टॅक्स क्रेडिट जुळणी करून घ्यावी लागेल. उदाहरणार्थ, जुलै २0१७ ते मार्च २0१८ या वर्षात ‘अ’ने ‘ब’कडून बिलाद्वारे एक लाखाचा माल खरेदी केला आणि त्यावर ३बीमध्ये १२ हजारांचे जीएसटी क्रेडिट घेतले असेल तर आता ती खरेदी २एद्वारे ‘अ’ला तपासून घ्यावी लागेल. त्यानंतरच ‘अ’ला इनपुट टॅक्सचे क्रेडिट मिळेल.अर्जुन : कृष्णा, करदात्याने जीएसटीआर-२ए पासून काय करावे?कृष्ण : करदात्याने जीएसटीआर-२ए व लेखापुस्तकांमधील बिलाप्रमाणे खरेदीची जुळवणी करावी. जर करदात्याकडून त्याच्या लेखापुस्तकांत काही एंट्रीज सुटल्या असतील, तर त्या व्यवस्थित करून घ्याव्यात. तसेच जर करदात्याकडे खरेदीचे बिल आहे; पण त्याच्या जीएसटीआर-२एमध्ये ते परावर्तित होत नसेल, तर करदात्याने विक्रेत्याशी संपर्क साधून बिलांची जुळवणी करून घ्यावी.अर्जुन : या जीएसटीआर-२एमुळे काय फरक पडेल?कृष्ण : खरेदी-विक्री करताना खूप भांडणे होतात. डिस्काउंट, रेड डिफरन्स, पैसे कमी-जास्त येणे, पैसे बुडवणे, हे विषय असेच राहतात. आता खरा जीएसटीचा मॅचिंग, मिसमॅचिंगचा काळ सुरू झाला आहे.अर्जुन : कृष्णा, यातून करदात्याने काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, प्रत्येक व्यक्तीने सर्व खरेदी-विक्री जुळवून घ्यावी. जर विक्रेत्याने सरकारला जीएसटी भरला नाही किंवा योग्य रिटर्न दाखल केले नाही, तर त्याचा भुर्दंड खरेदीदाराला बसणार आहे. खरेदीदार व विक्रेता यांच्यातील खरे-खोटे व्यवहार आता जीएसटीत पकडले जातील. अर्थातच जीएसटीची मॅच आता सुरू झाली आहे. यात कोणाकोणाची विकेट पडते, हे पाहावे लागेल.

टॅग्स :जीएसटी