Made In India Chips: भारत आता केवळ मोबाईल आणि कम्प्युटर वापरणारा देश नसून, भविष्यात चिप बनवणारा देश बनण्याच्या दिशेनं वेगानं वाटचाल करत आहे. याच दिशेनं, अमेरिकेची चिप उत्पादक कंपनी इंटेल (Intel) आणि देशातील प्रमुख औद्योगिक समूह टाटा ग्रुप (Tata Group) यांच्यात एक महत्त्वाचा करार झाला आहे. या करारानुसार, भारतात सेमीकंडक्टर चिप्सचं उत्पादन आणि असेंब्ली केली जाईल. ही भागीदारी भारताच्या उदयोन्मुख सेमीकंडक्टर इकोसिस्टमला नवीन बळकटी देईल आणि आत्मनिर्भर तंत्रज्ञान मिशनला गती देईल.
टाटा समूहाने दिलेल्या माहितीनुसार, या भागीदारी अंतर्गत इंटेलच्या प्रोडक्ट्सचं उत्पादन आणि पॅकेजिंग गुजरातच्या धोलेरा येथे उभारल्या जात असलेल्या टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या सेमीकंडक्टर फॅक्टरीमध्ये आणि आसाममध्ये स्थापन करण्यात येत असलेल्या टाटाच्या आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्टिंग प्लांटमध्ये होईल. टाटा समूह या दोन्ही मोठ्या सुविधा उभ्या करण्यासाठी जवळपास ₹१.१८ लाख कोटींची मोठी गुंतवणूक करत आहे. दोन्ही कंपन्या ॲडव्हान्स्ड पॅकेजिंग टेक्नॉलॉजीवरही एकत्र काम करतील, जेणेकरून भारतातच हाय-एंड चिप सोल्युशन्स तयार करता येतील.
शेअर आहे की सोन्याची खाण! ५ वर्षात १ लाखांचे झाले ₹५.९६ कोटी, कोणता आहे हा स्टॉक?
एआय सक्षम कम्प्युटर सिस्टीम बनवणार
या भागीदारी अंतर्गत इंटेल आणि टाटा समूह एआय-सक्षम (AI-Enabled) म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं युक्त कम्प्युटर सिस्टीम तयार करतील. तज्ज्ञांचा अंदाज आहे की २०३० पर्यंत भारत जगातील टॉप-५ पीसी मार्केटमध्ये समाविष्ट होऊ शकतो. अशा परिस्थितीत, इंटेल आणि टाटाचा हा उपक्रम देशांतर्गत बाजारासाठी रणनीतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण यामुळे आयातावरील अवलंबित्व कमी होईल आणि स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल.
₹१.१८ लाख कोटींची गुंतवणूक
टाटा समूह गुजरात आणि आसाममधील युनिट्स उभे करण्यासाठी जवळपास ₹१.१८ लाख कोटींची मोठी गुंतवणूक करत आहे. चिप उत्पादन स्थापित करणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी हा एक आहे. या प्रकल्पांमुळे केवळ हजारो लोकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार नाहीत, तर भारत जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळीत एक मजबूत खेळाडू म्हणून उदयास येईल.
इंटेलनं काय म्हटलं?
इंटेलचे सीईओ लिप-बू टॅन यांनी या करारावर आनंद व्यक्त केला. भारत जगातील सर्वात वेगानं वाढणाऱ्या कम्प्युटिंग मार्केट्सपैकी एक आहे. पीसीची वाढती मागणी आणि एआय टेक्नॉलॉजीचा वेगाने स्वीकार केल्यामुळे भारतात खूप संधी आहेत. टाटा समूहासोबतची ही भागीदारी इंटेलला भारतात आपलं कामकाज वेगानं विस्तारण्यास मदत करेल आणि दोन्ही कंपन्या एकत्र येऊन मोठ्या स्तरावर इनोव्हेशन पुढे नेतील, असं ते म्हणाले.
टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली. ही भागीदारी भारतात एक मजबूत आणि व्यापक तंत्रज्ञान इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल आहे. त्यांनी सांगितलं की, इंटेलची एआय-आधारित कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी आणि टाटाची ॲडव्हान्स्ड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्षमता यांचं मिश्रण भारताला सेमीकंडक्टर आणि सिस्टीम सोल्युशन्सचे एक प्रमुख ग्लोबल हब बनवू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
