Join us

सोमवारपासून संघर्ष समितीचे आंदोलन मनपाला दिली नोटीस

By admin | Updated: December 3, 2014 22:35 IST

अकोला: सेवानिवृत्त तसेच कार्यरत कर्मचार्‍यांच्या वेतनाची समस्या निकाली काढण्यास प्रशासन अपयशी ठरले असून, पाचव्या वेतन आयोगासह सहाव्या वेतन आयोगाची रक्कम थकीत आहे. मनपा कर्मचार्‍यांच्या अडचणी सोडविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे नमूद करीत येत्या ८ डिसेंबरपासून आंदोलन छेडण्याचे महापालिका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी संघर्ष समितीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. तशी नोटीस समितीने प्रशासनाकडे बुधवारी सुपूर्द केली.

मनपा कर्मचार्‍यांच्या हिताकडे दुर्लक्ष करीत प्रशासन कामकाज करीत असल्याने कर्मचार्‍यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सेवानिवृत्त तसेच कार्यरत कर्मचार्‍यांचे वेतन थकीत असून, जुलै महिन्यापासून अद्यापही पगारवाढ लागू करण्यात आली नाही. कालबद्ध पदोन्नतीची वेतन श्रेणी लागू करून फरकाची रक्कम त्वरित देण्याची मागणी संघर्ष समितीने केली आहे. रजा रोखीकरण, उपदानाची रक्कम सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना मुदतीच्या आत वाटप करावी. तसेच पगारातील कपात केलेली रक्कम कर्मचार्‍यांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करावी; परंतु या बाबींकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत संघर्ष समितीने येत्या ८ डिसेंबरपासून आंदोलन छेडणार असल्याचे स्पष्ट केले. तशी रीतसर नोटीस प्रभारी मनपा आयुक्तांना देण्यात आली. ८ डिसेंबरला मनपासमोर ताटवाटी वाजविण्याचे आंदोलन, १० ते १२ डिसेंबरपर्यंत तीन दिवस काळ्या फिती लावून कामकाज, २३ डिसेंबर रोजी मनपा कार्यालयावर मोर्चा तसेच आंदोलनाची दखल न घेतल्यास २३ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडणार असल्याचे संघर्ष समितीच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

बॉक्स...कामकाज होणार प्रभावित
वरिष्ठ अधिकारी अपमानास्पद वागणूक देतात, मध्यरात्रीपर्यंत बैठका घेऊन जाणीवपूर्वक मानसिक छळ करतात. नियमात नसतानासुद्धा वेतनवाढ रोखण्यात आल्याचा आरोप करीत कर्मचारी संपाच्या मुद्यावर ठाम आहेत. यामुळे मनपाचे प्रशासकीय कामकाज प्रभावित होण्यासोबतच त्याचा परिणाम शहरातील पथदिवे, साफसफाई व पाणीपुरवठ्यावर होणार असल्याचे चिन्हं आहे.